पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त :  भाजपला धक्का  - Dismissal of West Maharashtra Devasthan Samiti | Politics Marathi News - Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त :  भाजपला धक्का 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

भाजपचे अध्यक्ष असलेली पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्याचे आदेश गुरुवारी राज्य शासनाने काढले.

कोल्हापूर : भाजपचे अध्यक्ष असलेली पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्याचे आदेश गुरुवारी राज्य शासनाने काढले. या समितीवर प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या या आदेशामुळे समितीचे अध्यक्ष व भाजपचे महेश जाधव यांच्यासह सहा सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. 

कोल्हापुरसह सांगली व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील सुमारे तीन हजार 42 मंदिरांचा महसुलासह त्यावरील नियंत्रणाची जबाबदारी या समितीकडे होती. 2010 ते 2017 या काळात समितीला अध्यक्षच नव्हते, निवडच न झाल्याने या पदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे होता. राज्यात 2014 मध्ये भाजप शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतरही पहिली तीन वर्षे या समितीला अध्यक्ष व सदस्यच नव्हते.

राज्य सरकारच्या प्रयत्नांना साथ द्या-शरद पवारांचे जनतेला आवाहन

राज्य शासनाने समितीच्या अध्यक्षपदी 16 ऑगस्ट 2017 रोजी महेश जाधव यांची तर कोषाध्यक्ष म्हणून वैशाली क्षीरसागर व सदस्य म्हणून शिवाजी जाधव, राजाराम गरूड, राजेंद्र जाधव, चारूदत्त देसाई यांची नियुक्ती केली होती. गेली चार वर्षे या समितीमार्फत कामकाज सुरू होते.  

राज्यात 2019 मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर गेल्या दीड वर्षात सरकारने भाजपचे अध्यक्ष व सदस्य असलेल्या राज्यस्तरीय समित्या व महामंडळे बरखास्त करून तेथे तीन पक्षांच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर भाजपनियुक्त अध्यक्ष व सदस्यच कार्यरत होते.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा दावा खोटा...महाराष्ट्रच नव्हे तर भाजपची सत्ता असलेल्या राज्यांतही लस टंचाई

त्यामुळे गुरुवारी राज्य शासनाने अध्यक्षांसह समितीचा कार्यकाल संपुष्टात आणून जिल्हाधिकारी यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच धक्का दिल्याचे बोलले जाते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख