जयंत पाटलांची उमेदवारी कापण्यात आघाडीवर असलेल्या भोसलेंना पाठिंबा का? - Director of Rajarambapu Spinning Mill Uday Shinde criticizes NCP's Valva taluka president Vijay Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

जयंत पाटलांची उमेदवारी कापण्यात आघाडीवर असलेल्या भोसलेंना पाठिंबा का?

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

विजय पाटील यांनी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्षाच्या दावणीला बांधू नये.

नवेखेड (जि. सांगली)  ः ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचे वाळवा (जि. सांगली) तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्षाच्या दावणीला बांधू नये. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत संस्थापक पॅनेलचा विजय निश्चित आहे,’’ असे आवाहन राजारामबापू सहकारी सूतगिरणीचे संचालक उदय शिंदे यांनी केले.

वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिंदे बोलत होते. या वेळी उदय शिंदे म्हणाले की, विजय पाटील यांनी साखराळे येथे भोसले गटाच्या व्यासपीठावर जाऊन त्यांना पाठिंबा देत आपली भूमिका जाहीर केली. वास्तविक आमचे नेते जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कोणतीही भूमिका जाहीर करण्याआधी विजय पाटील यांनी केलेले वक्तव्य हे बालीशपणाचे लक्षण आहे.

‘‘जयंत पाटील यांचे खच्चीकरण करण्यासाठी भोसले गटाने अनेक वेळा प्रयत्न केले आहेत. जनता पक्षातून (स्व.) राजारामबापू पाटील हे निवडणूक लढवीत असताना (स्व.) जयवंतराव भोसले हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. विधानसभेच्या 1985 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांचा कमी वयाचा दाखला देऊन त्यांचा पत्ता कट करण्यात भोसले कुटुंबीय आघाडीवर होते. जयवंत शुगर उभारणी करताना पेठ परिसरात जागेची चाचपणी केली होती. या भागात सक्षम कारखाने असल्याने लोकांनी त्यांना विरोध केला, हे विसरू नये, असे शिंदे यांनी नमूद केले आहे. 

कृष्णा कारखान्याची निवडणूक हा स्वतंत्र विषय व राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र विषय आहे, याची गल्लत विजय पाटील यांनी करू नये. अविनाश मोहिते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस आहेत, याचे भान विजय पाटील यांनी ठेवावे. वाळवा तालुक्यातील कृष्णा कारखान्यातील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची 2000 मते कराडमध्ये वर्ग केली त्यावेळी आम्ही विजय पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी त्यावर काहीही कारवाई केली नाही.

कृष्णा कारखान्याचे खासगीकरण करण्यासाठी भोसले यांनी सुरू केलेले प्रयत्न सभासदांच्या लक्षात आल्याने सभासदांचा सत्तेच्या विरोधात मोठा रोष दिसत आहे, त्यामुळे भेदरलेल्या भोसले गटाने अशा पद्धतीचा ‘गोबेल्स नीती’चा अवलंब केला आहे. वाळवे तालुक्यातील सुज्ञ सभासद या आमिषाला बळी पडणार नाहीत, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

या वेळी कृष्णा कारखान्याचे माजी संचालक सुरेश पाटील, सुभाष पाटील, संभाजी दमामे, केदार शिंदे ,वसंतराव पाटील, महेश पवार, शिवराज जाधव, सुहास पाटील आदी ;ा वेळी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख