चंद्रकांत पाटलांकडून शरद पवारांचे कौतुक, तर उद्धव ठाकरेंना टोमणा  - Chandrakant Patil praised Sharad Pawar, while Uddhav Thackeray was taunted | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांत पाटलांकडून शरद पवारांचे कौतुक, तर उद्धव ठाकरेंना टोमणा 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 12 डिसेंबर 2020

शुभेच्छा पत्रात पवारांच्या कार्याचे कौतुक करत असताना उद्धव ठाकरे यांना मात्र टोमणा मारण्यात आला आहे. 

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकाच शुभेच्छा पत्रातून अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. पवारांच्या राजकीय नेतृत्वाची प्रशंसा करत असताना शेतकरी सर्व बंधनातून मुक्त होऊन जीवनात पुढे जाऊ शकतील, अशा विधेयकांना पवारांकडून समर्थन मिळेल, असे म्हणत सध्याच्या कृषी विधेयकांबाबत अप्रत्यक्ष भाष्य केले आहे. 

दुसरीकडे, "कोरोना महामारीच्या काळातही आपल्या वयाची पर्वा न करता, आपल्या सहयोगी पक्षातील काही नेत्यांना लाजवतील, असे दौरे केले,' असं म्हणत अप्रत्यक्षरित्या शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चंद्रकांतदादांनी निशाणा साधला आहे. 

शरद पवारांच्या आत्मवृत्तपर पुस्तकातील काही मजकुराचा, तसेच ते कृषिमंत्री असताना त्यांनी विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला देत पवारांचे कृषी विधेयकांना समर्थन आहे, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे. त्याचे पवारांसह राष्ट्रवादीकडून खंडन करण्यात आले आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा पत्राद्वारे त्यांच्याकडून कृषी विधेयकाबाबत अपेक्षा व्यक्त केली आहे. 

कोरोना महामारीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडत नाहीत, अशी टीका भाजपच्या सर्वच नेत्यांकडून करण्यात येत आहे. आताही तोच धागा पकडून पवारांच्या शुभेच्छा पत्रात त्यांच्या कार्याचे कौतुक करत असताना उद्धव ठाकरे यांना मात्र टोमणा मारण्यात आला आहे. 

काय म्हटलंय चंद्रकांत पाटलांनी शुभेच्छा पत्रात? 

महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल 50 वर्षे पूर्ण करून अनेक राजकीय नेत्यांसाठी आदर्श असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. त्यांच्या कार्याच्या अनुभवाचा फायदा आघाडी सरकारला व्हावा, अशी आशा आहे. पवार यांना उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. 

राजकारणात सदैव मतभेद पाहायला मिळतील. मात्र, मनभेद कधीच नाही. असेच भिन्न विचारसरणीचे मात्र अनेक राजकारण्यांचे मार्गदर्शक शरदचंद्र पवार यांचा आज वाढदिवस. राजकारणात तब्बल 50 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तीन वेळा पदभार सांभाळला. राज्याच्या हितासाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांचा विशेष उल्लेखनीय निर्णय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देऊन त्यांना सरकारी निर्णय प्रक्रियेत सामील करून घेणं. 

भारताचे कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी शेती आणि दूध उत्पादनात वाखाणण्याजोगे प्रयोग केले. शेतकरी सर्व बंधनातून मुक्त होऊन जीवनात पुढे जाऊ शकतात, अशा सर्व विधेयकांना पवार यांच्याकडून समर्थन मिळाले आहे आणि पुढेही मिळेल. कोरोना काळातही आपल्या वयाची पर्वा न करता, आपल्या सहयोगी पक्षातील काही नेत्यांना लाजवतील, असे दौरे त्यांनी केले. 

राजकारणात आपले विचार आणि आपले आदर्श हे वेगळे राहतील; परंतु महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी आपण सरकारमध्ये आणि सरकारच्या बाहेर देखील नेहमीच मार्गदर्शन करत राहाल, अशी मी आई अंबाबाईकडे प्रार्थना करतो, असे त्यांनी म्हटलं आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख