भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना कोरोना - BJP MLA Gopichand Padalkar Found Corona Positive | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना कोरोना

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला असून आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यांची नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल प्रलंबित होता. ते मुंबईत अधिवेशनासाठी गेले आहेत

सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला असून आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यांची नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल प्रलंबित होता. ते मुंबईत अधिवेशनासाठी गेले आहेत. तेथे पोहोचल्यानंतर त्यांचा अहवाल आज 'पॉझिटीव्ह' आला. त्यांना कोणताही त्रास नसून प्रकृती ठीक असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.

सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, मिरजेचे आमदार सुरेश खाडे, तासगाव चे आमदार सुमनताई पाटील, खानापूरचे आमदार अनिल बाबर, जतचे आमदार विक्रम सावंत, विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत आणि मोहनराव कदम यांना कोरोनाची बाधा झाली आहे.  यापैकी सदाभाऊ खोत आणि मोहनराव कदम हे कोरोना मुक्त होऊन पुन्हा एकदा कामाला लागले असून अन्य आमदारांच्या वर सध्या उपचार सुरू आहेत.  आमदार खाडे आणि गाडगीळ हे सध्या घरी थांबून उपचार घेत आहेत. सदाभाऊ खोत कोरोनामुक्त होऊन आंदोलनात उतरले आहेत. आमदार सुमनताई पाटील यांच्या घरातील अन्य मुलासह  अन्य सदस्यही पॉझिटिव्ह आहेत. पालकमंत्री जयंत पाटील कृषी राज्यमंत्री श्री विश्वजीत कदम हे दोघे सुरक्षित आहेत.मात्र या सर्व आमदारांसोबत बैठकांना एकत्र असतातच त्यामुळे जिल्ह्यातील  नेत्यांची काळजी आता वाढली आहे.

माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार नितीन शिंदे, राजेंद्रअण्णा देशमुख, संभाजी पवार,  काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील काँग्रेसचे शहर जिल्हाप्रमुख पृथ्वीराज पाटील यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.  सांगलीचे माजी महापौर हरून शिकलगार यांचा तर कोरोनाने धक्कादायक मृत्यू झाला. हे सर्व राजकीय क्षेत्रातील मंडळी गेल्या पाच सहा महिन्यापासून कोरोना विरुद्धच्या लढाईत मैदानात उतरून काम करत आहेत.  कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना रुग्णांना तातडीने सेवा उपलब्ध करून देण्याचे महाकाय आव्हान सांगली जिल्ह्यात समोर उभे आहे.

दोन दिवसांपूर्वी सांगलीचे पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा याचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. सुहेल शर्मा यांना दोन दिवसापूर्वी कोरानाची लक्षणं दिसल्यानं त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता ती पॅाझिटिव्ह आली आहे. सुहेल शर्मा यांनी होमक्वारंटाइन करण्यात आले आहे. घरीच त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले. 
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख