शाहू आघाडीवर सतेज पाटलांचे वर्चस्व; समर्थकाला उमेदवारी न मिळाल्याने मुश्रीफ नाराज

प्रमुख नेत्यांनी आपल्या घरातील पुढची पिढी निवडणुकीच्या रिंगणात उतरवली आहे.
Announcement of Shahu Shetkari Vikas Aghadi candidates for Gokul Dudh Sangh elections
Announcement of Shahu Shetkari Vikas Aghadi candidates for Gokul Dudh Sangh elections

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. यात  पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाला सर्वाधिक सात जागा मिळाल्या आहेत. मल्टीस्टेटवरुन मागील पाच वर्षात सत्ताधाऱ्यांना जेरीस आणलेल्या प्रमुख शिलेदारांना मात्र या वेळी डावलण्यात आले आहे. यावेळी प्रमुख नेत्यांनी आपल्या घरातील पुढची पिढी निवडणुकीच्या रिंगणात उतरवली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ज्यांच्यासाठी नेत्यांना फोन केला होता, त्या माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनाही अनसुचित जाती प्रवर्गातून उमेदवारी देण्यात आली आहे.

गोकुळच्या निवडणुकीसाठी पालकमंत्री सतेज पाटील,  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार प्रा.संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत पॅनेलची घोषणा करण्यात आली. या पॅनेलमध्ये हसन मुश्रीफ यांचे पुत्र नाविद, खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र विरेंद्र, आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी व खासदार मंडलिक यांच्या भगिनी सौ. सुश्‍मिता, माजी आमदार के. पी. पाटील यांचे पुत्र रणजित पाटील, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे पुत्र कर्णसिंह, माजी आमदार कै.यशवंत एकनाथ पाटील यांचे पुत्र अमरसिंह, माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित यांना उमेदवारी दिली आहे. 

आबीटकर गटाला दोन जागा

गोकुळच्या सत्तारुढ महाडिक पाटील गटातून फुटून आलेले ज्येष्ठ संचालक विश्‍वास नारायण पाटील व अरुण डोंगळे यांच्यासह संघाचे संस्थापक (कै.) आनंदराव पाटील चुयेकर व माजी संचालिका जयश्री पाटील यांचे पुत्र शशिकांत यांना उमेदवारी मिळाली आहे. आमदार प्रकाश आबीटकर यांच्या गटाला नंदकुमार ढेंगे व अभिजित तायशेटे या दोघांच्या रुपाने दोन जागा मिळाल्या आहेत.

आमदार विनय कोरे यांना अपेक्षेप्रमाणे दोन जागा

दरम्यान, राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीत सर्वाधिक सात जागा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाला मिळाल्या आहेत. त्यांच्या गटाकडून विश्‍वास पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, बाबासो चौगले, प्रकाश पाटील, विद्याधर गुरबे, बयाजी शेळके, अंजना रेडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडून नाविद मुश्रीफ, अरुण डोंगळे, खासदार प्रा.संजय मंडलिक यांच्या गटाकडून त्यांचे पुत्र विरेंद्र मंडलिक रिंगणात उतरले आहेत. आमदार विनय कोरे यांना अपेक्षेप्रमाणे दोन जागा मिळाल्या असून त्यांनी अमरसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. आमदार प्रकाश आबीटकर गटाने अभिजित तायशेटे, नंदकुमार ढेंगे, आमदार राजेश पाटील यांनी सुश्‍मिता राजेश पाटील, महाबळेश्‍वर चौगले, चंद्रदीप नरके यांच्याकडून अजित नरके, एस. आर. पाटील, के. पी. पाटील यांनी रणजितसिंह पाटील, तर ए. वाय. पाटील यांनी किसन चौगले यांना गोकुळच्या रिंगणात उतरवले आहे.


राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे पॅनेल  

सर्वसाधारण गट - विश्‍वास पाटील आबाजी (शिरोली दुमाला, ता.करवीर), अरुण डोंगळे घोटवडे (ता.राधानगरी), शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर (चुये. ता.करवीर), बाबासाहेब श्रीपती चौगले (केर्ली,ता.करवीर), अजित नरके (कसबा बोरगाव, ता.पन्हाळा), नावेद मुश्रीफ (लिंगनूर,ता.कागल), करणसिंह गायकवाड (सुपात्रे,ता.शाहूवाडी), विरेंद्र मंडलिक (चिमगांव, ता.कागल), नंदकुमार ढेंगे (मडिलगे बु.ता.भुदरगड), अभिजित तायशेटे (सोन्याची शिरोली, ता.राधानगरी) , प्रकाश रामचंद्र पाटील (नेर्ली, ता.करवीर), रणजित के.पी.पाटील (मुदाळ,ता.भूदरगड), विद्याधर गुरबे (नेसरी,ता.गडहिंग्लज) , एस.आर.उर्फ संभाजी रंगराव पाटील (प्रयाग चिखली,ता.करवीर), महाबळेश्‍वर शंकर चौगले (माद्याळ,ता.गडहिंग्लज), किसन बापुसो चौगले (चाफोडी,ता.राधानगरी).

इतर मागासवर्ग - अमरसिंह यशवंत पाटील(कोडोली, ता.पन्हाळा). अनुसुचित जाती जमाती - डॉ.सुजित मिणचेकर (मिणचे, ता.हातकणंगले). भटक्‍या विमुक्‍त जाती,जमाती - बयाजी देवू शेळके (वेसरफ, ता.गगनबावडा). महिला प्रतिनिधी- सुश्‍मिता राजेश पाटील (म्हाळेवाडी,ता.चंदगड) , अंजना रेडेकर (पेद्रेवाडी,ता.आजरा).

तब्बल 12 जणांना या वेळी उमेदवारी नाकारण्यात आली

दरम्यान, पाच वर्षापुर्वी झालेल्या निवडणुकीसह गेली पाच वर्षे ‘गोकुळ' च्या सत्ताधाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरून लढणाऱ्या शेतकरी कामगार पक्षासह बाळासाहेब कुपेकर, विजयसिंह मोरे, किरणसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतिश पाटील, माजी सदस्य मधूकर देसाई, किशोर पाटील आदींना यांना ठेंगा दाखवण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीत विरोधी आघाडीचे उमेदवार असलेल्या तब्बल 12 जणांना या वेळी उमेदवारी नाकारण्यात आली. गेल्या वेळी महिला गटातून उमेदवार असलेल्या श्रीमती संजीवनीदेवी गायकवाड यांच्याऐवजी त्यांचे पुत्र कर्णसिंह यांना उमेदवारी देण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्यांच्यासाठी फोन केला त्या माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनाही अनसुचित जाती प्रवर्गातून उमेदवारी देण्यात आली आहे.

गेल्या वेळच्या बहुतांश उमेदवारांचा पत्ता कट

गेल्या निवडणुकीत या पॅनेलचे उमेदवार असलेले मधुकर देसाई, बाळासाहेब कुपेकर, किरणसिंह पाटील, किशोर आनंदराव पाटील, भूषण जयवंत पाटील, शंकर दादासो पाटील, भिमगोंड बोरगावे, विजयसिंह मोरे, बाबासाहेब शंकरराव शिंदे, हिराबाई भैरु पाटील, चंद्रकांत गणपती गवळी, आंबाजी दादासो पाटील, नाना सत्याप्पा हजारे अशा 13 जणांना या वेळी कात्रजचा घाट दाखवण्यात आला. यापैकी भूषण पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच या गटाला सोडचिठठी दिली होती. त्यामुळे त्यांचा उमेदवारीसाठी विचार होण्याची शक्‍यता नव्हती.

मंत्र्यांना काढावी लागणार नाराजांची समजूत

विरोधी आघाडीकडे इच्छुकांची संख्या खूपच होती. मात्र गेली पाच वर्षे ज्यांनी गोकुळच्या मल्टीस्टेट विरोधात रान उठवले त्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल, अशी विरोधी गटात सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र पॅनलेमध्ये नेत्यांचा पुत्रांचा भरणा झाल्यानंतर चर्चेतील कार्यकर्त्यांची नावे मागे पडली. त्यामुळेच या नाराज कार्यकर्त्यांनी पॅनेल जाहिर करताना दांडी मारली. त्यांची नाराजी काढण्याची जबाबदारी दोन्ही मंत्र्यांवर आली आहे.


हसन मुश्रीफ नाराज

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे खांदे समर्थक व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांची गोकुळची उमेदवारी पक्की मानली जात होती. पाटील यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढत ठराव धारकांशी संपर्क साधला होता. मात्र उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी मोठी खलबते झाली. राष्ट्रवादीचे चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी दोन जागांचा आग्रह धरला. तसेच या दोन्ही जागा चंदगड विधानसभा मतदारसंघात देण्याचा आग्रह धरला. त्यामुळे सतीश पाटील यांचा पत्ता कट झाला. मुश्रीफ यांनी सतीश पाटील यांना उमेदवारी मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्‍त केली असल्याचेही सांगण्यात आले.

दिलीप पाटील दोन दिवसांत निर्णय घेणार

गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष व विरोधी आघाडीकडून उमेदवारीसाठी चर्चेत असलेल्या दिलीप पाटील यांना मोठाच धक्‍का बसला. त्यांची उमेदवारीही ऐनवेळी कापण्यात आली. शिरोळ तालुक्‍यात बहुजनांची मोट बांधण्याचे काम पाटील यांनी केले. या कामाचा फटका त्यांना बसल्याचे सांगण्यात येत आहे. तालुक्‍यातीलच मोठ्या नेत्यांनी पाटील यांना धक्‍का दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन दिवसात ठराव धारकांची बैठक घेवून ते पुढील निर्णय घेणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com