almatti dam not the reason for flood in sangli and kolhapur | Sarkarnama

या कारणांमुळे `अलमट्टी`ला `क्लिन चीट`! : सांगली-कोल्हापुरातील नेत्यांची पंचाईत

उमेश घोंगडे
मंगळवार, 2 जून 2020

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात 2019 मध्ये आलेल्या महापुराला अलमट्टी धरण जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्रातील नेते करत होते. मात्र सरकारने समितीनेच नेमलेल्या समितीने त्या धरणाला निर्दोष ठरविल्याने या नेत्यांची पंचाईत होणार आहे. 

पुणे : कृष्णा व पंचगंगा नदीला गेल्यावर्षी मोठा पूर आल्याने कोल्हापूर आणि सांगली शहरासह जिल्ह्यातील बराचसा भाग पाण्याखाली गेला. सांगली व कोल्हापूर या दोन शहरांत धोकादायक पातळीच्या वर 14 ते 15 फूट पाणी वाहत होते. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाणी सोडले जात नसल्याने त्याचा फुगवटा हा कोल्हापूरपर्यंत आल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र या आरोपातून अलमट्टीला क्लिन चीट मिळाली आहे.

या पूराच्या अभ्यासासाठी राज्य सरकारने नेमलेल्या नंदकुमार समितीने अभ्यासाअंती या पुराला अलमट्टी धरण जबाबदार नसल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यासाठी समितीने काही पडताळणी केली आहे. त्या आधारे ही `क्लिन चीट` देण्यात आली आहे. समितीच्या म्हणण्यानुसार पूरस्थितीच्या काळात म्हणजे 27 जुलै ते 13 आॅगस्ट या 18 दिवसांत कृष्णेच्या खोऱ्यात 434 टीएमसी पाणी साचेल इतका पाऊस झाला. या भागात सरासरी ३३३ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना तब्बल १९२८ मिलीमीटर पाऊस पडला. सरासरीच्या जवळपास सहापट पाऊस पडला आणि त्याच पटीने पाणी साचले.

सहा लाख 80 क्युसेकने पाणी अलमट्टीत

कृष्णेच्या खोऱ्यातील 22 धरणांत त्यातील केवळ 104 टीएमसी पाणी अडविले गेले. या धरणांची पाणी साठविण्याची एकूण क्षमता 222 टीएमसी आहे. मात्र पावसाळ्याचे सुरवातीचे दिवस आणि शासकीय सूचनांनुसार जुलै आणि आॅगस्टमध्येच धरणे पूर्ण क्षमतेने भरता येत नाही. त्यामुळे 104 पाणी टीएमसी पाणी अडवून उरलेले पाणी धरणांतून सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. परिणामी या 22 धरणांतून तब्बल 330 टीएमसी पाणी हे कृष्णा नदीवर असलेल्या राजापूर बंधाऱ्यातून अलमट्टीत पोहोचले. याशिवाय घटप्रभा, दूधगंगा या नद्यांतून आणि `फ्रि कॅचमेंट`भागातून आणखी 277 टीएमसी पाणी अलमट्टीत पोहोचले. या दोन्ही ठिकाणच्या पाण्याचा प्रवाह मिळून तब्बल 600 टीएमसी पाणी या 18 दिवसांत त्या धरणास मिळाले. अलमट्टीत पाणी येण्याचा कमाल `इन फ्लो` हा 6 लाख 80 हजार क्युसेक होता तर धरणातून कमाल पाच लाख 80 हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे कर्नाटकने पाणी सोडले नाही, या आरोपात तथ्य नसल्याचे समितीचे मत पडले. जर आणखी जास्त क्षमतेने पाणी सोडले असते तर कर्नाटकातील चार जिल्हे आणखी जलमय
होण्याचा धोका होता. त्या धरणाची सध्याची पाणी साठविण्याची क्षमता 123 टीएमसी आहे. (त्या धरणाची उंची आणखी वाढवून ही क्षमता 300 टीएमसी करण्याचे कर्नाटक सरकारचे नियोजन आहे. मात्र त्याला महाराष्ट्रने आक्षेप घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने तो फेटाळला आणि उंची वाढविण्याची परवानगी दिली आहे. अद्याप काम सुरू झालेले नाही.)

 

 Panel to study Almatti dam effect on floods

अलमट्टीचा फुगवटा महाराष्ट्रात नाहीच 

कराड येथे कृष्णा नदीवरील पुलापासून अलमट्टी धरण ३७० किलोमीटर तर सांगलीपासून २६३ किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर महाराष्टाच्या हद्दीत राजापूर बंधारा आहे. याच बंधाऱ्यातून महाराष्ट्राने तीन लाख 43 हजार क्युसेक इतक्या कमाल क्षमतेपर्यंत (11 आॅगस्ट 2019) पूरकाळात पाणी अलमट्टीसाठी सोडले. या बंधाऱ्यापासून पलिकडे कर्नाटकच्या हद्दीत हिप्परगी बंधारा आहे. या बंधाऱ्यामध्ये कर्नाटकच्या हद्दीत २२ किलोमीटरवर अलमट्टीच्या पाण्याचा फुगवटा संपल्याचे समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे सहा लाख 80 क्युसेकने पाणी येऊनही अलमट्टीचा फुगवटा हा महाराष्ट्रापर्यंत पोहोचला, ही टीका समितीने खोडून काढली आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे आणि अभ्यासाप्रमाणे अलमट्टीमुळे सांगली-कोल्हापूरला पूर येतो हे निदान शास्त्रीय अभ्यासातून तरी सिद्ध होत नसल्याचे वडनेरे यांनी स्पष्ट केले. मात्र यासाठी आणखी अभ्यासाची आणि माहितीची गरज आहे. आमचे निष्कर्ष हे आम्हाला जी माहिती उपलब्ध झाली त्यावर आधारीत आहेत. आणखी खोलात जाऊन अभ्यास केल्यानंतर यावर आणखी प्रकाश पडू शकेल.  आणखी खोलात जाऊन अभ्यास केल्यानंतर यावर आणखी प्रकाश पडू शकेल. अलमट्टीचा पुराशी संबंध नाही, याकडे आम्ही संकेत केलेला आहे. थेट निष्कर्ष नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

कृष्णा खोऱ्यातील पुराला अटकाव करण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांत समन्वय असण्याची गरज वडनेरे यांनी व्यक्त केली. त्यासाठी `रिअल टाईम`मध्ये माहितीचे अदानप्रदान होऊन निर्णय घेणे सोपे होईल. पूराचे धोके टाळण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचे असल्याचे वडनेरे यांनी निक्षून सांगितले. 

कृष्णा नदीला एकुण चार उपनद्या मिळतात. कुरूंदवाड येथे पंचगंगा, सांगलीजवळ हरिपूर येथे वारणा नदी,  ब्रम्हनाळजवळ येरळा आणि दूधगंगा नदी राजापूर बंधाऱ्याजवळ कर्नाटकच्या हद्दीत कृष्णेला मिळते. या प्रत्येक संगमाच्या जवळची गावे गेल्या वर्षीच्या पुरात अधिक बुडाली होती, असे निरीक्षण अभ्यास समितीतील सदस्यांनी व्यक्त केले. 

शंभर वर्षांतील कमाल पाऊस

कृष्णा, पंचगंगा, वारणा,येरळा या नद्यांच्या पात्रात अनेक प्रकारची अतिक्रमणे झालीत. शेत जमीन वाढविण्यासाठी पात्रात झालेले अतिक्रमण, शहरी भागात नदी पात्रातील बांधकामांची अतिक्रमणे, नद्यांना जोडणारे नाले, ओढे बुजविण्याचे प्रकार, नद्यांवर गावोगावी बांधण्यात आलेले घाट, टाकण्यात येणारा राडारोडा, वाहतुकीसाठी नदी पात्रावर बांधण्यात आलेले नवे व जुने पूल या साऱ्या प्रकारामुळे या दोन मुख्य नद्यांसह सर्व उपनद्यांमध्ये गेल्या काही वर्षात गाळ वाढल्याने नद्यांची पात्रे काही फुटांनी उंचावली आहेत. कृष्णा नदीवर कराड ते अलमट्टी धरण या दरम्यान महाराष्ट्राच्या हद्दीत तब्बल ८० पूल आणि इतर बांधकामे करण्यात आली आहेत. वाहतुकीसाठी बांधण्यात आलेल्या पुलांच्या पिलरमुळे पाण्याच्या प्रवाहाला मोठ्या प्रमाणात अडथळा येतो. त्यातच गेल्या
वर्षी शंभर वर्षातील सर्वात जास्त पाऊस या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पडला. 

ही प्रमुख कारणे

  • * नदीपात्रात असलेल्या रहदारीच्या ८० पूलांमुळे आणि इतर बांधकामांमुळे नदीच्या वहन क्षमतेत अडथळे.
  • * सांगली, कोल्हापूर ही दोन्ही शहरे तसेच दोन्ही जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात नदीत पात्रात झालेली अतिक्रमणे हा प्रवाहाला ठरणारा सर्वात मोठा अडथळा.
  • * कृष्णा नदीला मिळणाऱ्या येरळा, पंचगंगा, वारणा व दूधगंगा या चार नद्यांच्या प्रवाहात अतिक्रमणे, राडारोडा बांधलेले घाट यामुळे अनेक अडथळे.
  • * या चारही नद्यांच्या संगमाजवळ फुगवटा होत असल्याने या नद्यांचे पाणी थांबून राहते.
  • * गेल्यावर्षी सरासरीच्या सहापट पडलेला पाऊस.गेल्या शंभर वर्षातील हा सर्वाधिक पाऊस होता.
  • * कृष्णा नदीत १७ ठिकाणी नदीचा प्रवाह वेडावाकडा असल्याने पाण्याचा प्रवाह अडला जातो.
  • * या भागातील गावे व शहरांतील नैसर्गिक ओढे-नाले बुजवण्यात आल्याने पाण्याचा निचरा होण्यात अडचणी
  • *नद्यांमध्ये गाळ साचल्याने नैसगिक वहन क्षमतेत झालेली घट
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख