Alliance talks between Avinash Mohite and Inderjit Mohite came to a halt due to allotment of seats
 Alliance talks between Avinash Mohite and Inderjit Mohite came to a halt due to allotment of seats

दोन मोहित्यांच्या मनोमिलनाची बोलणी या कारणामुळे फिस्कटली

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे कृष्णा कारखान्याची तिरंगी लढत होवूनप्रचाराचा धुरळा उडेल.

इस्लामपूर  ः यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या युतीमध्ये मिठाचा खडा पडतोय की काय असे चित्र निर्माण झाले आहे. या दोघांच्या युतीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी दिलेली यादी इंद्रजित मोहिते यांना मान्य नसल्याने या मनोमिलनाची घोषणा धूसर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भोसले गटाने मनोमिलन झाले तरी आणि नाही झाले तरी लढण्यासाठी मोठी तयारी केली आहे. (The alliance talks between Avinash Mohite and Inderjit Mohite came to a halt due to allotment of seats)

कृष्णा सहकारी साखर कारखान्यात डॉ. सुरेश भोसले गट, इंद्रजित मोहिते गट व अविनाश मोहिते गट अशा तीन पॅनेलनी ही निवडणूक लढायची तयारी गेल्या पाच वर्षांपासून सुरु केली आहे. या कारखान्याचा 50 वर्षांचा इतिहास पाहिला असता कोण, कधी कुणाबरोबर युती करेल, याचा नेम नाही. भल्याभल्यांचा राजकीय अंदाज चुकवणारी निवडणूक म्हणून कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीकडे पाहिले जाते. 

प्रारंभी (स्व.) जयवंतराव भोसले व थोर विचारवंत यशवंतराव मोहिते या बंधूंचे मनोमिलन असल्याने या कारखान्याचे कामकाज सुरु होते. त्यानंतर या बंधूंमध्ये कृष्णा कारखाच्या सत्तेवरुन वितुष्ट निर्माण झाल्याने कृष्णेच्या कार्यक्षेत्रात मोहिते व भोसले अशा दोन गटांत विभागणी होऊन मोठा संघर्ष निर्माण झाला. या संघर्षात सुमारे 40 वर्षाचा काळ लोटला. कधी भोसले तर कधी मोहिते गट सत्तेवर होता.

या दरम्यान मदनराव मोहिते हे यशवंतराव मोहिते यांच्या बरोबर होते. मात्र 10 वर्षांपूर्वी मोहिते-भोसले गटाचे ऐतिहासिक मनोमिलन झाले. हे मनोमिलन झाल्यानंतर काही दिवसातच इंद्रजित मोहिते या मनोमिलनातून बाहेर पडले. या दरम्यानच कारखान्याच्या संस्थापक पॅनेलमधील (स्व.) आबासाहेब मोहिते यांचे नातू अविनाश मोहिते यांनी आपला स्वतंत्र गट करत कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवत ऐतिहासिक सत्तांतर केले. त्यावेळी माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी अविनाश मोहिते यांची पाठराखण करत मोठी ताकद दिली होती. मात्र, कृष्णेच्या आजवरच्या राजकीय इतिहासात जे घडले, तेच परत उंडाळकर व अविनाश मोहिते यांच्या गटात घडले. यांचे मनोमिलनही फार काळ टिकले नाही. 

उंडाळकर गटाने अविनाश मोहिते गटाची साथ सोडत डॉ. सुरेश भोसले यांच्या गटाची गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पाठराखण करीत त्यांना ताकद दिली. गेल्या पंचवार्षिक तिरंगी निवडणुकीत भोसले गटाची सत्ता आली. मात्र, अविनाश मोहिते यांच्यासह पाच संचालक गेल्यावेळच्या निवडणुकीत निवडून आले. डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या गटाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते यांनी वेळोवेळी भोसले गटावर आरोप केले. 

राज्यात महाआघाडी झाल्यानंतर कृष्णेतही अविनाश मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते गट एकत्रित येण्यासाठी हालचाली सुरु झाल्या. त्या हालचाली अगदी कालपर्यंत सुरु होत्या. मात्र चेअरमन पदाचा कार्यकाल व कोणाचे किती संचालक यावर अविनाश मोहिते व इंद्रजित मोहिते यांच्या गटात मोठी रस्सीखेच सुरु असल्याने झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्या. मोहिते-भोसले यांच्या युतीसाठी प्रयत्न करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चेच्या गुऱ्हाळाला ‘आमचा रामराम घ्यावा’ असे म्हणत या पुढे कृष्णेच्या चर्चेत आपण भाग घेणार नाही, अशी घोषणा सोमवारी केली. त्यामुळे युतीची बोलणी फिस्कटल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यातच अविनाश मोहिते व इंद्रजित मोहिते यांच्या गटाने स्वतंत्र प्रचार सुरू केल्याने ही युती होणार नसल्याचे दिसत आहे. 

या बाबत अविनाश मोहिते म्हणाले, ‘‘चर्चेसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांकडे आम्ही आमची यादी दिली आहे. ती यादी डॉ. इंद्रजित मोहिते यांना मान्य नसल्याने आता आम्हालाही चर्चेत स्वारस्य नाही. आम्ही स्वतंत्र लढणार आहोत.’’

डॉ. इंद्रजित मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता ते फोनवर उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे आता गेल्या पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे कृष्णा कारखान्याची तिरंगी लढत होवून  प्रचाराचा धुरळा उडेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com