निवडणूक जिंकण्यासाठी आपल्याला पावसात सभा घेण्याची गरज नाही - You don’t have to hold a meeting in the rain to win an election : Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

निवडणूक जिंकण्यासाठी आपल्याला पावसात सभा घेण्याची गरज नाही

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

देवेंद्र फडणवीस भाषणाला उभे राहिले, तेव्हा कधीही पाऊस कोसळू शकतो, असे वातावरण तयार झाले होते.

पंढरपूर : भाषणाला उठण्यापूर्वी माढ्याचे आपले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मला म्हणाले, देवेंद्रजी, पावसात सभा घेण्याची आता तुमची बारी आहे. पण, आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नाही, अशा शब्दांत नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना चिमटा काढला. 

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारनिमित्त पंढरपुरात सोमवारी (ता. १२ एप्रिल) फडणवीस यांची सभा झाली. त्यात ते बोलत होते. सभेला सुरुवात होण्यापूर्वी पंढरपुरात काहीसे ढगाळ वातावरण होते. देवेंद्र फडणवीस भाषणाला उभे राहिले, तेव्हा कधीही पाऊस कोसळू शकतो, असे वातावरण तयार झाले होते. त्या पार्श्वभूमीवर निंबाळकर यांनी फडणवीस यांना उद्देशून भाष्य केले आणि त्याला फडणवीस यांनी उत्तर देत राष्ट्रवादीच्या नेत्यांना चिमटे काढले. 

दरम्यान, भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रूक सभा घेतली. त्यात सभेत जोरदार पाऊस झाला होता. या पावसातही पाटील यांनी आपले भाषण केले होते. 

राज्यात 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी साताऱ्यात शरद पवार यांच्या झालेल्या सभेत पाऊस पडला. त्या भरपावसात पवार यांनी केलेले भाषण राज्यात गाजले. त्यामुळे उदयनराजे यांच्यासारख्या दिग्गज उमेदवाराचा पराभव झाला. त्याची आठवण या निमित्ताने सभेत निघाली होती. या दोन्ही सभांचा फडणवीस यांच्या बोलण्याला संदर्भ होता.  

फडणवीस म्हणाले ‘‘पंढरपूरच्या पोटनिवडणकीत तुम्ही महाविकास आघाडीचा कार्यक्रम करा; मी राज्यात यांचा कार्यक्रम करून दाखवतो. समाधान आवताडे यांच्या रुपाने तुम्ही मला एक आमदार दिला, त्यांचा करेक्ट कार्यक्रम मी केलाच म्हणून समजा. ही निवडणूक एका मतदारसंघापुरती असली तरी महाराष्ट्रात ही निवडणूक एक आचार, विचार आणि मार्ग घेऊन येणार आहे. एका मतदारसंघातील निवडणूक जिंकली काय आणि हारले काय. त्याने काय फरक पडणार आहे. याने सरकार थोड बदलते. त्यावर मी त्यांना सांगितले की सरकार बदलायचे असेल तर आम्हाला निवडणुकीची गरज नाही. जेव्हा बदलायचे असेल, तेव्हा सरकारही बदलून दाखवू.’’ 

ही निवडणूक आज याचसाठी महत्त्वाची आहे की, लोकशाहीत सरकारचा अनाचार, दुराचार अत्याचार आणि भ्रष्टाचार वाढल्यानंतर अशा सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी मतांचा अधिकार सर्वात महत्वाचा असतो. या जुलमी सरकारच्या विरोधात सर्वात प्रथम मतदान करण्याचा अधिकार पंढरपूर आणि मंगळवेढ्याच्या नागरिकांना या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख