सोलापुरात राष्ट्रवादी पाडणार सेना-एम आय एम ला भगदाड ?  - Will NCP give dent to Shivsena and MIM in Solapur | Politics Marathi News - Sarkarnama

सोलापुरात राष्ट्रवादी पाडणार सेना-एम आय एम ला भगदाड ? 

विश्वभूषण लिमये
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकीय भूकंप घडविला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोलापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे आणि एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख हे दोघेही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे.

सोलापूर : सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकीय भूकंप घडविला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोलापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे आणि एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख हे दोघेही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे.

कांही दिवसांपूर्वीच एम आय एम चे नेते तौफिक पाहिलवान हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या उपाध्यक्ष विद्या लोलगे यांच्या मध्यस्थीने सर्व नऊ नगरसेवकांसह भेट घेतली...तर शिवसेनेचे नेते महेश कोठे यांनी ही शरद पवारांची भेट घेतल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षातील नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

सोलापूरमध्ये सध्या महापालिका विरोध पक्ष नेते असणारे शिवसेनेचे महेश कोठे अन् एम आय एम चे तौफिक पहिलवान हे मूळचे काँग्रेसी मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दोघांनी ही काँग्रेस ला सोडचिट्टी दिली होती. सोलापूर शहर मध्य मधून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात कधीकाळी त्यांचेच हाडाचे कार्यकर्ते असणाऱ्या तौफिक पहिलवानांनी एम आय एम चा पतंग उडवला तर महेश कोठेंनी शिवसेनेच धनुष्यबाण हाती घेतलं...दोघांनी ही शिंदे यांना तगडी लढत दिली...यामध्ये तौफिक पहिलवान दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर कोठे तिसऱ्या क्रमांकावर राहिले अन् प्रणिती शिंदेंनी सोलापूर शहर मध्य मधून निसटता विजय मिळवला...

2014 ते 2019 च्या निवडणुकां दरम्यान पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं... 2019 ला शहर मध्य मधून शिवसेनेने महेश कोठेंच तिकीट कापलं आणि  निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून सेनेत प्रवेश करणाऱ्या दिलीप मानेंना उमेदवारी दिली तर तिकडे तौफिक पहिलवान हे पाडगनूर केस प्रकरणात विजापूर तुरुंगात असल्याने फारुख शाब्दी यांना उमेदवारी देण्यात आली...एवढं सगळं होऊन ही प्रणिती शिंदे यांनी शहर मध्य मधून आमदारकीची हॅट्रिक साधली..त्यामुळं सर्व समीकरणच बदलून गेली...

दरम्यान, जर सोलापूर शहर मध्य मधील हे दोन तगडे गडी राष्ट्रवादीच्या गळाला लागले तर शहरातील राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मात्र शिवसेना नेते महेश कोठे यांनी अद्याप मी पवार साहेबांची भेट घेतली नाही विरोधकांकडून हेतुपुरस्पर अशा बातम्या पेरल्या जातं आहेत असं म्हटलं आहे.राष्ट्रवादीत प्रवेश या केवळ अफवा आहेत. यापूर्वी मी भाजपमध्ये जाणार म्हणून काही जणांकडून भांडवल करत माझं शिवसेनेचे तिकीट कट करण्याचा षडयंत्र रचलं गेलं होतं. त्याच पद्धतीचे षडयंत्र आता पुन्हा माझ्याबाबतीत रचले जात आहे, असा खुलासा कोठेंनी केला. 

दरम्यान, तौफिक पहिलवान हे राष्ट्रवादीमध्ये जाण्यासाठी अनुकूल असल्याचं सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळं येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने सोलापूरमध्ये मोठे राजकीय भूकंप घडवून आणले तर आश्चर्य वाटायला नको.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख