....म्हणून जयंत पाटील कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत आपली भूमिका जाहीर करत नाहीत - ...So Jayant Patil is not announcing his role in the election of Krishna sugar factory | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

....म्हणून जयंत पाटील कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत आपली भूमिका जाहीर करत नाहीत

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 10 एप्रिल 2021

तीनही गटांनी या तालुक्याला झुकते माप दिले आहे.

नवेखेड (जि. सांगली) : कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जसंजशी जवळ येईल, तसंतशी त्यात रंगत वाढू लागली आहे. सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र कृष्णा कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांना भिडल्याने ऐन उन्हाळ्यात राजकीय वातावरण आणखी गरम झाले आहे.

कृष्णा हा सातार जिल्ह्यात असला तरी या साखर कारखान्याच्या निवडणुकीत वाळवा तालुक्याची भूमिका ही नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. या कारखान्याची सत्ता डॉ. इंद्रजित मोहिते, डॉ. सुरेश भोसले, अविनाश मोहिते यांच्या गटाने आलटून पालटून मिळविली आहे. जवळपास 45 हजारांच्या वर सभासद संख्या असणाऱ्या या कारखान्याची निवडणूक नेहमीच रंगतदार होत असते. सभासदांचा कल कोणाकडे आहे, याचा शेवटपर्यंत अंदाज बांधता येत नाही.

वाळवा आणि कराड तालुक्याच्या बरोबर सीमारेषेवर असणाऱ्या या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या प्रत्येक निवडणुकीत वाळवा तालुक्याने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. किंबहुना तीनही गटांनी या तालुक्याला झुकते माप दिले आहे. कारखान्याच्या संचालक मंडळात वाळवा तालुक्यातील सात ते आठ संचालक असतात. यामध्ये बहुतांश संचालक हे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना मानणारे असतात. परंतु जयंतराव पाटील कधीही आपली भूमिका जाहीर करत नाहीत, हा इतिहास आहे. कारण कारखान्याच्या तीनही गटांत वाळवा तालुक्यातील त्यांचे समर्थकच असतात.

गेल्या दोन दिवसांपूर्वी साखराळे येथे भोसले गटाच्या संपर्क दौऱ्यात साखराळे येथील विजय पाटील यांनी भोसले गटाला वाळवा तालुक्याचा पाठिंबा आहे, असे जाहीर केले. वास्तविक विजय पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असल्याने चर्चेला मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली आहे. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अविनाश मोहिते गटात असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येत विजय पाटील यांच्या या भूमिकेला आव्हान दिले आहे. 

राजारामबापू सहकारी सूतगिरणीचे संचालक बोरगाव येथील उदय शिंदे यांनी आम्हीही जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे समर्थक आहोत, असे सांगत विजय पाटील यांच्या ‘तालुक्याचा पाठिंबा’ यावर आक्षेप घेतला आहे. त्यातूनच आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कृष्णा कारखान्यावर सत्ता मिळवू पाहणाऱ्या तीनही गटाचा कार्यक्षेत्रात संपर्क दौरा सुरू असल्याने या घटनांनी वातावरण तापले आणि वाळवा तालुक्यात निवडणूक फिव्हर वाढीस लागला. वाळवा तालुक्यात एकसंघ असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने सामना रंगतदार होऊ लागला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख