धक्कादायक  ः कोरोनाला कंटाळून बार्शीत तरुणाची आत्महत्या - Shocking : Young man commits suicide in Barshi after getting fed up with Corona | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक  ः कोरोनाला कंटाळून बार्शीत तरुणाची आत्महत्या

प्रशांत काळे
मंगळवार, 6 एप्रिल 2021

उमेश हा 5 एप्रिल रोजीच्या सायंकाळपासूनच सारखे बडबड करत होता.

बार्शी (जि. सोलापूर) : बार्शी शहरातील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पॉलिटेक्‍निक कॉलेज येथील कोविड केअर सेंटरमध्ये बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथील उमेश भागवत कोंढारे (वय 37) या कोरोना पॉझिटिव्ह तरुणाने आत्महत्या केली आहे. बार्शी शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येची माहिती समजताच इतर रुग्णांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

वैद्यकीय अधिकारी सुधीर घोडके यांनी याबाबतची माहिती बार्शी शहर पोलिसांना दिली. ही घटना मंगळवारी (ता. ६ एप्रिल) पहाटे साडेचारच्या दरम्यान घडली. पॉलिटेक्‍निक कॉलेज या कोविड सेंटर येथे सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यात आले आहे. 

उमेश कोंढारे याचा 31 मार्च रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला होता. आरोग्य प्रशासनाने त्यानंतर त्याच्या कुटुंबातील आई, पत्नी, दोन मुलगे यांची कोरोना चाचणी घेतली असता सर्वजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे सर्वांनाच पॉलिटेक्‍निक कॉलेज कोविड केअर सेंटर येथे ठेवण्यात आले होते.

कोविड सेंटरच्या पहिल्या मजल्यावर रुग्णांनी कपडे, साड्या धुवून वाळत टाकलेल्या असतात. तेथे स्वच्छतागृह आहे. मंगळवारी पहाटे साडेचारच्या दरम्यान उमेश कोंढारे पहिल्या मजल्यावर गेला आणि त्याने वाळत घातलेली साडी घेऊन स्वच्छतागृहाच्या खिडकीला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

कालपासून बडबड करत होता

उमेश कोंढारे याने कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह झाल्यानंतर चार दिवस स्वत:च्या घरीच औषधोपचार घेतले होते. त्यानंतर त्यास अस्वस्थ वाटू लागल्याने 3 एप्रिलपासून त्याला बार्शी येथल कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले होते, अशी माहिती डॉ. सुधीर घोडके यांनी दिली. 

उमेश हा 5 एप्रिल रोजीच्या सायंकाळपासूनच सारखे बडबड करत होता. ‘माझे काही खरे नाही, मी आता जगत नाही. मला टेन्शन आले आहे. माझ्या मुलांना व्यवस्थित सांभाळा व तुम्ही व्यवस्थित राहा, अशा प्रकारची बडबड तो कुटुंबीयांकडे  करत होता, असे पोलिसांना देण्यात आलेल्या जबाबात म्हटले आहे. पोलिसांनी उमेशची आई व पत्नी यांचे व्हिडिओग्राफी केलेले जबाब नोंदविले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख