कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने सुरु केली तयारी - Shivsena Started Preparations for Kolhapur Municipal Corporation Elections | Politics Marathi News - Sarkarnama

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने सुरु केली तयारी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

आगामी कोल्हापूर महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज राहा, असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले आहे. या निमित्ताने शिवसेनेने सदस्य नोंदणी अभियान सुरु केले आहे.

कोल्हापूर  : आगामी कोल्हापूर महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज राहा, असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले आहे. या निमित्ताने शिवसेनेने सदस्य नोंदणी अभियान सुरु केले आहे.

सदस्य नोंदणीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुजित चव्हाण, आमदार प्रकाश आबिटकर, अंबरिश घाटगे, शिवाजी जाधव, दिलीप माने, प्रा. सुनील शिंत्रे, बाजीराव पाटील आदी उपस्थित होते. यावेळी दुधवडकर म्हणाले, "महापालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र लढायचे की, महाविकास आघाडी एकत्र लढायचे याचा निर्णय राज्यस्तरावर होईल; अन्यथा 'एकला चलो रे' ची भूमिका घ्यावी लागेल. महापालिकेबरोबर जिल्हा परिषद निवडणूक तितकीच महत्त्वाची आहे. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने म्हणतात, की मुंबईनंतर शिवसेना कुठे अस्तित्वात असेल, तर ती कोल्हापुरात. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेला मानणारा आहे, हे यापूर्वीच सिद्ध झाले आहे,''

ते पुढे म्हणाले, ''मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर संकटावर संकट येत आहेत, मात्र त्यांची छाती मर्दाची आहे. राष्ट्रवादीची साथ आहे, हे सर्वात महत्त्वाचे आहे. सीमाप्रश्‍नाबाबत मराठी बांधवांवर होणारा अत्याचार असू दे, किंवा अन्य कोणताही प्रश्‍न असू दे, प्रत्येक भूमिकेत शिवसेना आक्रमक राहिलेली आहे. तो चेहरा आपल्याला पुढे चालवायचा आहे.''

"पदाधिकाऱ्यांच्या कामाबाबत जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी व्यक्त केलेली खंत योग्य आहे. पदाधिकाऱ्यांनी कामाला लागायला हवे. गेल्या निवडणुकीत पाच आमदार कसे पडले, याचे आत्मपरीक्षण करू. महामंडळावर यापुढे प्रामाणिक शिवसैनिकालच न्याय दिला जाईल. पदाधिकाऱ्यांनी अशा शिवसैनिकांची नावे माझ्याकडे द्यावीत. पडताळणी करून या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची आमची भूमिका आहे.'' असेही त्यांनी सांगितले

जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, "आमदार पदाधिकारी यांच्यापेक्षा शिवसेना महत्त्वाची असून, त्यादृष्टीनेच पदाधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणीबाबत योगदान द्यावे. शिवसेना आहे म्हणून आपण आहोत. आपण आहोत म्हणून शिवसेना आहे, असे कुणी समजू नये. पदे मिरवण्यासाठी नव्हे तर कामासाठी असतात.'' विजय देवणे म्हणाले, ""जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने सदस्य नोंदणी महत्त्वाची आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक हा संकल्प राबवावा. पक्षासाठी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी केली जाईल.''राधानगरी भुदरगड तालुक्‍यातून मोठ्या संख्येने किमान पन्नास हजार सभासदांची नोंदणी करू, असे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख