उत्तर रत्नागिरीत सेनेवर तटकरे इफेक्‍ट; शिवसेनेचे दोन्ही आमदार झाले सक्रीय - Shivsena MLA's in Ratnagiri became active after Sunil Tatkare Tour | Politics Marathi News - Sarkarnama

उत्तर रत्नागिरीत सेनेवर तटकरे इफेक्‍ट; शिवसेनेचे दोन्ही आमदार झाले सक्रीय

मुझफ्फर खान 
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

खासदार सुनील तटकरेंच्या दौऱ्यानंतर उत्तर रत्नागिरीतील शिवसेनेचे दोन्ही आमदार सक्रिय झाले आहेत. तालुक्‍यात युवा सेनेच्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्याचे काम सुरू झाले आहे. हा एक प्रकारे तटकरे इफेक्‍ट मानला जात आहे.

चिपळूण : खासदार सुनील तटकरेंच्या दौऱ्यानंतर उत्तर रत्नागिरीतील शिवसेनेचे दोन्ही आमदार सक्रिय झाले आहेत. तालुक्‍यात युवा सेनेच्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्याचे काम सुरू झाले आहे. हा एक प्रकारे तटकरे इफेक्‍ट मानला जात आहे.

तटकरे संजय कदमांना सर्वत्र बरोबर नेत होते. योगेश यांच्यामुळे तटकरेंच्या दौऱ्याला प्रसिद्धी मिळाली. यानंतर सेनेचे प्रतिमा संवर्धन सुरू झाले आहे. खासदार सुनील तटकरे नुकतेच उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, आणि मंडणगड तालुक्‍यात त्यांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटन केले.

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि कार्यकर्त्यांच्या नियुक्‍त्या केल्या. चिपळुणात आमदार भास्कर जाधव त्यांच्या दौऱ्यात दिसले. मात्र दापोलीचे आमदार योगेश कदम यांना त्यांनी विश्‍वासात घेतले नाही. त्यामुळे आमदार कदम यांनी तटकरेंच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केल्याने तटकरेंच्या दौऱ्याची मोठी चर्चा झाली.

आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेतील विश्‍वासू आमदार म्हणून योगेश कदमांकडे पाहिले जाते. वर्षभर मतदारसंघात मर्यादित असलेले आमदार कदम हे भास्कर जाधवांसोबत उत्तर रत्नागिरी भागाचा दौरा करत आहेत. निवडणूक निकालानंतर प्रथमच हे चित्र पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिपद न मिळाल्याने भास्कर जाधव पक्षावर काहीसे नाराज होते. मतदारसंघ वगळता त्यांचे फारसे दौरे होत नव्हते. चिपळुणातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यानी त्यांची भेट घेऊन चिपळूणात सक्रिय होण्याची विनंती केली होती. दरम्यान, दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्‍यात युवा सेनेच्या बैठका झाल्या. त्याही बैठकांना जाधवांसह कदम उपस्थित होते. युवा सेनेच्या माध्यमातून उत्तर रत्नागिरीत शिवसेनेची बांधणी होताना दिसत आहे.

गुहागर, चिपळुणातील कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा
आमदार जाधव यांनी रविवारी सकाळी गुहागर तालुक्‍यातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. नंतर चिपळुणात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. दोन्ही बैठकांमध्ये आमदार योगेश कदम, सदानंद चव्हाण, सचिन कदम यांनी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या केल्या.

युवा सेनेच्या बैठकीला आमदार योगेश कदम उपस्थित राहिले. युवा नेता कसा असावा, हे त्यांच्या बोलण्यातून कार्यकर्त्यांना समजले. आमदार भास्कर जाधव ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. कार्यकर्त्यांनी परिपक्व होण्यासाठी कसे वागायला पाहिजे, याचा अनुभव भास्कर जाधवांकडून मिळाला. आमदार जाधव चिपळुणात सक्रिय झाल्यामुळे येथील संघटनेला त्याचा मोठा फायदा होणार आहे. -उमेश खताते, युवासेना, तालुकाधिकारी, चिपळूण.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख