तानाजी सावंत सक्रीय होताच जिल्हाप्रमुख बरडे लागले कामाला : मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र - Shiv Sena's Solapur district chief Purushottam Barde wrote a letter to the Chief Minister regarding the corona measures | Politics Marathi News - Sarkarnama

तानाजी सावंत सक्रीय होताच जिल्हाप्रमुख बरडे लागले कामाला : मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 20 मे 2021

सोलापूर शिवसेनेतील वाद सर्वश्रूत आहे.

सोलापूर  ः सोलापूरच्या (Solapur) शिवसेनेत (ShivSena) सुमारे दीड वर्षाच्या कालावधीनंतर सक्रीय होत संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत (MLA Tanaji Sawant) यांनी काही दिवसांपूर्वी संघटनेची बैठक घेतली होती. त्याच वेळी त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात दौरा करून कोरोना परिस्थितीचा आढावाही घेतला होता. तसाच, आढावा त्यांनी सोलापुरातही घेतला होता. त्याला जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे (Purushottam Barde) यांच्यासह काही शिवसेनेच्या महत्वाच्या पदाधिकारी गैरहजर राहून आपला स्वतंत्र बाणा दाखवून दिला होता. सावंत यांनी सक्रिय होत कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर आता जिल्हाप्रमुख बरडे हेही कामाला लागले असून त्यांनी जिल्ह्यातील प्रशासनात समन्वय घडवून आणावा, यासाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. (Shiv Sena's Solapur district chief Purushottam Barde wrote a letter to the Chief Minister regarding the corona measures)

सोलापूर शिवसेनेतील वाद सर्वश्रूत आहे. मंत्रीपद नाकारल्यानंतर आमदार सावंत हे दीड वर्षे पक्षनेतृत्वावर नाराज होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी बार्शीत उभारलेल्या कोविड सेंटरच्या उद्‌घाटनाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांना बोलावून मातोश्रीशी जुळवून घेतले होते. परंतु मधल्या बऱ्याच घडामोडी घडल्या. त्या काळात बरडे यांनी सक्रीय होत पक्षसंघटनेत कामाला सुरुवात केली होती. मात्र, सावंत सक्रीय होताच त्यांनी बोलावलेल्या पहिल्याच बैठकीला बरडे यांनी मात्र दांडी मारली होती. त्यामुळे पक्षातील दुही मात्र कायम राहिली आहे. 

हेही वाचा : मला आक्रमक व्हायला दोन मिनिटे लागतात.... : संभाजीराजेंचा इशारा

दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात बरडे यांनी म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर उपाय म्हणून प्रशासन विविध प्रयत्न करत आहे. मात्र, महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्यात पुरेसा समन्वय नसल्याचा परिणाम म्हणून सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्यात योग्य समन्वय घडवून आणावा, अशी मागणी जिल्हाप्रमुख बरडे यांनी केली आहे.

ग्रामीण भागातील नागरिक पुरेशा वैद्यकीय सुविधांअभावी कोरोनावरील उपचारासाठी सोलापूर शहरात येतात. यातील काही नागरिकांचा दुर्दैवाने मृत्यू होतो. अशावेळी नियमानुसार कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह ग्रामीण भागात न पाठवता कोव्हिडच्या नियमांचे पालन करून सोलापुरातच अंत्यसंस्कार करणे अपेक्षित आहे. मात्र, मृतदेह ग्रामीण भागात पाठवल्यानंतर संबंधित गावातील नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांची गर्दी अंत्यसंस्कारासाठी होते. यातूनच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार झपाटयाने होत आहे. 

याबाबत जिल्हा प्रशासनाचे धोरण जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क साधला असता त्यांनी मृतदेह ग्रामीण भागात देत नसल्याचे सांगितले. तर महापालिका प्रशासनाने मृतदेह ग्रामीण भागात देत असल्याचे सांगितले. इतक्‍या गंभीर मुद्द्यावर दोन्ही प्रशासनाची वेगवेगळी उत्तरे मिळाल्यानंतर दोन्ही प्रशासनात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे, असे बरडे यांनी पत्रात म्हटले आहे.

कोरोनाच्या पाठोपाठ राज्यात म्युकरमायकोसीस या आजाराची तीव्रता वाढत आहे. या आजारावरील उपचारामध्ये अँटी फंगल औषधे (एम्फोटेरिसिन बी, एम्फोमुल, एम्फोट्रेट इंजेक्‍शन) हा महत्वाचा भाग आहे. ती कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत. त्याबरोबरच ती महागदेखील आहेत. त्यामुळे ही औषधे अधिक प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत.
सोलापूर जिल्ह्यातही लसीकरण सुरू आहे. मात्र लशीचा नियमित आणि पुरेसा पुरवठा होत नसल्याने लसीकरणाची गती मंदावली आहे. परिणामी, सोलापूर जिल्हा लसीकरणात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मागे पडत आहे. त्यामुळे आपण सोलापूर जिल्ह्याला लशी अधिक प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात, असेही बरडे यांनी पत्रात म्हटले आहे.

कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन हे प्रयत्न करत आहेत. मात्र, पुरेशा समन्वयाअभावी हे प्रयत्न काही प्रमाणात फोल ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आपण योग्य ते आदेश पारित करून सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही पाठविण्यात आले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख