Shiv Sena leader Mahesh Kote will join NCP
Shiv Sena leader Mahesh Kote will join NCP

महेश कोठेंचं अखेर ठरलं : शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हणत राष्ट्रवादीत प्रवेश करणार 

विधानसभेला उमेदवारी नाकारल्याची सल कोठे यांच्या मनात कायम होती.

सोलापूर : गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला शिवसेनेचे नेते महेश कोठे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेशाचा मुहूर्त एकादाची ठरला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत येत्या शुक्रवारी (ता. 8 जानेवारी) ते मुंबईत शिवसेनेला "जय महाराष्ट्र' करत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांनी दिली. 

महेश कोठे यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत "शहर मध्य'मधून शिवसेनेकडून उमेदवारी अपेक्षित होती. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केलेले दिलीप माने यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासून कोठे हे नाराज होते. त्या निवडणुकीत कोठे यांनी बंडखोरी करत विधानसभा लढवली होती. त्यानंतर पक्षाने त्यांच्याकडे सोलापूर महापलिकेतील विरोधी पक्षनेतेपद कायम ठेवले होते. पण, विधानसभेला उमेदवारी नाकारल्याची सल कोठे यांच्या मनात कायम होती. 

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कोठे यांनी समर्थक नगरसेवकांसह कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक घेतली आहे. त्यात पुढील वाटचालीबद्दल चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. 

नगरसेवक अमोल शिंदे यांची विभागीय आयुक्‍तांकडून गटनेता तथा विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक महापौरांना पत्र देऊन त्यांची अधिकृत घोषणा करतील, असा नियोजित कार्यक्रम होता. मात्र, पुण्यातून येतानाच अमोल शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि नियोजित कार्यक्रम फिस्कटल्याचे पक्षातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी महेश कोठे यांनी पक्षातील काही नगरसेवकांना सोबत घेऊन विभागीय आयुक्‍तांकडे स्वतंत्र गट स्थापन करण्याची परवानगी मागितली होती. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विभागीय आयुक्‍तांकडील कोठे यांचा अर्ज तसाच होता. तो विषय आता विभागीय आयुक्‍तांकडून मार्गी लागल्याने कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेशातील अडसर दूर झाला आहे. 

राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची सत्ता आहे. या तिघांच्या वाटाघाटीत सोलापूर शहर मध्य हा विधानसभा मतदारसंघ आपल्याला मिळणार नाही. आगामी चार वर्षांत शहर उत्तर या मतदारसंघात विकास कामांच्या माध्यमातून बांधणी करत 2024 च्या निवडणुकीपूर्वी आपले स्थान बळकट करण्यासाठी कोठे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे ठरविल्याचे सांगण्यात येते. 

मातोश्रीवर गेलेले नगरसेवकही प्रवेश करणार 

शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीत उमेवारी न मिळाल्याने महेश कोठे यांनी काही नगरसेवकांना सोबत घेऊन "मातोश्री' गाठली होती. त्यातील काही नगरसेवक कोठे यांच्या कुटुंबातील असून काही नगरसेवक त्यांचे कट्टर समर्थक आहेत. पहिल्यांदा कोठे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी मातोश्रीवर जाताना कोठे यांच्यासोबत असलेले नगरसेवकसुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. कोठे यांच्यासोबत दहा-बारा नगरसेवक राष्ट्रवादीत गेल्यास शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्‍यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com