सचिवपदाच्या निवडीत जयवंतराव जगतापांनी दिली विरोधक बंडगरांना धोबीपछाड - Secretary of Karmala Bazar Samiti disobeyed the order of sabhapati Shivaji Bandagar | Politics Marathi News - Sarkarnama

सचिवपदाच्या निवडीत जयवंतराव जगतापांनी दिली विरोधक बंडगरांना धोबीपछाड

  अण्णा काळे
सोमवार, 31 मे 2021

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर बंडगर यांनी पुन्हा बागल गटाशी संधान साधले आहे. 

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव निवडीत सभापती शिवाजी बंडगर यांचा आदेश धुडकावत सचिव सुनील शिंदे यांनी सेवाज्येष्ठतेनुसार असलेले विठ्ठल क्षीरसागर यांच्याकडे पदभार सुपूर्द केला आहे. त्यामुळे आजच्या सचिव पदभार देण्याच्या विषयात सभापती शिवाजी बंडगर यांच्यापेक्षा सचिवच वरचढ ठरल्याने बाजार समिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सचिव निवडीवरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात चांगलीच चुरस झाल्याचे दिसून आले. आजच्या सचिव पदभार देण्याच्या प्रक्रियेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर बाजी मारल्याचे दिसून आले आहे. (Secretary of Karmala Bazar Samiti disobeyed the order of sabhapati Shivaji Bandagar)

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज सोमवार (ता. 31 मे) सकाळपासून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाजार समितीच्या कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले होते. बाजार समितीच्या ऑक्टोबर 2018 मध्ये झालेल्या सभापती निवडीवेळी शिवाजी बंडगर हे बंडखोरी करून बागल गटाकडून सभापती झाल्यापासून करमाळा बाजार समिती कायम वादात राहिली आहे. काही दिवसांनंतर बंडगर हे नारायण पाटील गटात सक्रिय झाले. त्यादरम्यानच्या काळात बाजार समितीत जगताप गटाला अनुकूल निर्णय होत होते. मात्र, विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर बंडगर यांनी पुन्हा बागल गटाशी संधान साधले आहे. 

हेही वाचा : शिवसेना सदस्यांनी अनिल देसाई आणि आढळराव यांचेही ऐकले नाही

बाजार समितीचे सचिव सुनील शिंदे हे आज सोमवार (ता. 31 मे) सेवानिवृत्त झाले. सचिव सुनील शिंदे यांना दोन वर्षांची मुदतवाढ देण्यासंदर्भात ता. 21 मे रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सत्ताधारी व विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली होती. त्या वेळी सचिव सुनील शिंदे यांना मुदतवाढ देण्याचा विषय मतदानाला टाकण्यात आला होता. दोन्ही बाजूने समान मते पडली होती. तेव्हा सभापती शिवाजी बंडगर यांनी सचिव सुनील शिंदे यांना मुदतवाढ नाकारण्याच्या बाजूने विशेष मताचा अधिकार वापरला होता,  त्यामुळे सचिव सुनील शिंदे यांना मुदतवाढ नाकारत त्यांच्या जागी प्रभारी सचिव म्हणून राजेंद्र पाटणे यांच्याकडे पदभार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

सेवाज्येष्ठता डावलून राजेंद्र पाटणे यांना सचिव करता येत नसल्याची भूमिका माजी सभापती जयवंतराव जगताप यांनी घेतली होती. त्यामुळे आज (ता. 31 मे) सचिव सुनील शिंदे यांना निरोप देत असतानाच प्रभारी सचिव म्हणून राजेंद्र पाटणे यांना पदभार देण्याचा विषय वादाचा ठरू शकतो, हे ओळखून पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

....तर त्यांनी हा निर्णय बदलून दाखवावा  : जगताप

शिवाजी बंडगर हे सभापतिपदाच्या लायकीचे नाहीत. ते आमच्याकडून निवडून येऊन बंडखोरी करून सभापती झाले आहेत. त्यांचा मार्केट कमिटीचा कसलाही अभ्यास नाही. अर्धवट ज्ञानाने ते चुकीचे निर्णय घेत आहेत. त्यांनी सभापती झाल्यापासून बेकायदेशीर प्लॉट दिले आहेत. याबाबत ऑडिट रिपोर्टमध्ये ताशेरे ओढण्यात आले आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार सचिव करणे बंडगर यांना चुकीचे वाटत असेल, तर त्यांनी हा निर्णय बदलून दाखवावा, असे आव्हान करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी बंडगर यांना दिले आहे. 

शिंदेंवर शिस्तभंगाची कारवाई करणार :  बंडगर
 
सचिव सुनील शिंदे यांनी माझ्या आदेशाचा अवमान केला आहे. सचिव निवडीबाबत मी देत असलेले पत्र त्यांनी स्वीकारले नाही. आम्ही प्रभारी सचिव म्हणून राजेंद्र पाटणी यांची निवड करायचे ठरवले होते. मात्र, शिंदे यांनी दुसऱ्याच व्यक्तीकडे पदभार दिला आहे. सभापतींचा आदेश मानला नसल्याबाबत आपण त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करणार आहोत, असे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख