सांगलीमध्ये भाजपात असंतोषाचे वारे; पदाधिकारी निवडीवरुन नाराजी - Sangli BJP Party Workers Upset over New Committee Appointments | Politics Marathi News - Sarkarnama

सांगलीमध्ये भाजपात असंतोषाचे वारे; पदाधिकारी निवडीवरुन नाराजी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी आपल्या कार्यकारिणीसह विविध आघाडी, सेलच्या निवडी जाहीर केल्या. मात्र यामध्ये महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह दिग्गज नगरसेवक, कार्यकर्त्यांना संधी दिलेली नाही. त्यांच्या समर्थकांनाही डावलले गेल्याची भावना आहे

सांगली : भाजपने शहर जिल्ह्याची जंबो कार्यकारिणी निवडीवरून नाराजीनाट्य सुरु आहे. अनेक आजी-नगरसेवक, नेत्यांच्या कार्यकर्त्यांना डावलून ठराविक गटांना संधी दिल्याच्या तक्रारी आहेत. निवडणुकीत पक्षाला मोठे सहकार्य केल्यानंतरही कार्यकर्त्यांना डावलले गेल्याने पक्षाच्या प्रदेशस्तरावरील नेत्यांकडे तक्रारी केल्या आहेत. स्थायी सदस्य निवडीत पालिकेतील प्रस्थापितांच्या शिफारशी डावलल्याची चर्चा आहे.

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी आपल्या कार्यकारिणीसह विविध आघाडी, सेलच्या निवडी जाहीर केल्या. मात्र यामध्ये महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह दिग्गज नगरसेवक, कार्यकर्त्यांना संधी दिलेली नाही. त्यांच्या समर्थकांनाही डावलले गेल्याची भावना आहे. या निवडी शिंदे यांच्या निवडीनंतर वर्षभर रेंगाळल्या होत्या. प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलल्याची मुख्य तक्रार आहे. महापालिका निवडणुकीपुर्वी भाजपमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीतूनही मोठी आयात झाली. त्याचा अपेक्षित परिणाम महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिसून आला. भाजपला महापालिकेत एकहाती सत्ता मिळाली. 

लोकसभा, सांगली-मिरज विधानसभा मतदार संघात चांगले यश मिळाले. त्यामुळे या आयात मंडळींना संघटनात्मक आणि पक्ष वाढीतही सामावून घेतले जाईल अशी आशा होती. मात्र आता ठराविकांनाच कार्यकारिणीतच संधी दिल्याची भावना आहे.

गेल्या आठवड्यात स्थायी समितीसाठी निवडीवेळीही तेच झाले. ताकदवान नेते-कार्यकर्त्यांचे खच्चीकरणाची तक्रार प्रदेशपर्यंत गेली. पालिकाअंतर्गत गटबाजीलाही त्यामुळे जोर येण्याची शक्‍यता आहे. प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदारांनी यात लक्ष न घातल्यास पुढच्या महत्वाच्या निवडींमध्ये पक्षाला मोठा धक्का बसू शकतो असा इशारा ही नाराज मंडळी देत आहेत.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख