सांगली : गटनेता निवडीच्या निमित्ताने भाजपमधील नाराजीनाट्याला उघड तोंड फुटले आहे. येत्या 21 फेब्रुवारीपर्यंत नूतन महापौरांची निवड होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी ही नाराजी शमवण्याचे आव्हान भाजप श्रेष्ठींसमोर असेल. दुसरीकडे राष्ट्रवादीतील अनेकांना महापौरपदाची स्वप्ने पडत असून कॉंग्रेसच्या गोटातून मात्र राष्ट्रवादीला थंडा प्रतिसाद आहे.
भाजपच्या पहिल्या वहिल्या बहुमताच्या सत्तेनंतर युवराज बावडेकर यांना गटनेतेपदाची संधी मिळाली. त्यांनी महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी अनुभवी लक्ष्मण नवलाई, भारती दिगडे, स्वाती शिंदे, जगन्नाथ ठोकळे यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र भाजप श्रेष्ठींनी विनायक सिंहासने या नवख्या नगरसेवकाला संधी दिली. सिंहासने यांना दिलेली संधी एका अर्थाने भाजपमधील काठावरच्या मंडळींना इशाराही आहे.
अशा अनुभवींना डावलल्याने उपमहापौर आनंदा देवमाने यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यांना स्थायी समिती सभापतिपदात रस होता; मात्र त्याऐवजी त्यांची बोळवण उपमहापौरपदावर केल्याने ते नाराज होते. त्या नाराजीला त्यांनी महापौरपदाच्या तोंडावर वाट करून दिली आहे. त्यांची ही नाराजी महापालिका वर्तुळात मिरजकरांच्या तिरक्या चालीची सुरवात मानली जात आहे.
महापौरपदासाठी उमेदवाराचे नावही आता कोल्हापूरच्या चिठ्ठीतून येणार
भाजपमधून महापौरपदासाठी युवराज बावडेकर, अजिंक्य पाटील, धीरज सूर्यवंशी, निरंजन आवटी, स्वाती शिंदे यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. गटनेता निवडीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून चिठ्ठीतून नाव मागवण्यात आले. त्यामुळे महापौरपदासाठी पक्ष उमेदवाराचे नावही आता कोल्हापूरच्या चिठ्ठीतून येणार हे जवळपास स्पष्ट आहे. अर्थात सांगली-मिरजेतील दोन आमदार आणि आणि स्थानिक भाजप नेतेच नाव सुचवतील हे निर्विवाद असले तरी ते नाव सदस्यांच्या गळी उतरवण्यासाठी पाटील यांच्या चिठ्ठीचाच पर्याय पुढे केला जाईल असे दिसते.
चंद्रकांत पाटील यांनी स्थायी समिती सभापती निवडीवेळीच पुढचा महापौर ब्रॅन्डेड भाजपचा असेल असे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे भाजपमधील नाराजांची पक्षाकडून फारशी दखल घेतली जायाची शक्यता नाही. आता पक्षांतर्गत नाराजी बाहेर आली आहे. स्थानिक पातळीवर एकमताने निवडीचे आव्हान कायम असल्याचे दिसून येते.
कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या गोटात मात्र महापौर निवडीबाबत सध्या पुढाकार नाही. कारण राष्ट्रवादीतून प्रारंभी मैन्नुद्दीन बागवान यांनी नाव पुढे करताच त्यांना पक्षातून विरोध झाला. पंधरा नगरसेवकांच्या बळावर राष्ट्रवादीचा हा पुढाकार 20 सदस्य असलेल्या कॉंग्रेसला गृहित धरुन होता. त्यामुळे कॉंग्रेसचे गटनेते उत्तम साखळकर यांच्यासह सर्वांनीच यावर मौन पाळले. कॉंग्रेसच्या या थंड प्रतिसादामुळे राष्ट्रवादीमधील हालचालींना मर्यादा आल्या आहेत.
राष्ट्रवादीतील सर्वांची भिस्त जयंत पाटील "करेक्ट' कार्यक्रम करतील यावरच.
राष्ट्रवादीतील सर्वांची भिस्त जयंत पाटील "करेक्ट' कार्यक्रम करतील यावरच आहे. अर्थात महापालिकेतील सत्ता थेट ताब्यात घेण्याऐवजी राष्ट्रवादीच्या स्थानिक कारभाऱ्यांना अप्रत्यक्ष सत्तेत स्वारस्य आहे. तेच मत कॉंग्रेसमधील काही कारभारी नगरसेवकांचेही आहे. महापौरपदासाठी मोट बांधण्याऐवजी भाजपमधील दुफळीची वाट पहा असा सर्वसाधारण सध्या कल आहे. त्यामुळे भाजपच्या नाराजीला फुंकर घालण्यासाठी सध्या तरी कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून फारसा पुढाकार दिसत नाही.

