आर. आर. आबांचे नाव...बाबरांची समयसूचकता...आणि अजितदादांनी सांगलीला दिले वाढीव 20 कोटी  - R. R. Patil's name Mentioning, Ajit Pawar gave Sangli an additional fund of Rs 20 crore | Politics Marathi News - Sarkarnama

आर. आर. आबांचे नाव...बाबरांची समयसूचकता...आणि अजितदादांनी सांगलीला दिले वाढीव 20 कोटी 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

हुशार आहे तुम्ही लोक....

सांगली : सांगली जिल्हा नियोजन निधी वाटपासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पुण्यात घेतलेल्या बैठकीतील एक किस्सा सध्या जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनात चर्चेत आला आहे. या बैठकीत दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे नाव घेतले अन्‌ जिल्ह्याला 20 कोटी रुपये जास्तीचे मिळाले, त्यामुळे आबांच्या पश्‍चातही त्यांच्या नावाचा विकासाला फायदा होत आहे, अशी चर्चा आहे. 

त्याचे झाले असे, अजित पवार यांनी सांगली जिल्ह्याला 280 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. जिल्ह्यातील मागणी सुमारे सव्वातीनशे कोटी रुपयांची होती. सांगलीला 280 कोटींचा निधी म्हटल्यावर आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, अधिकारीही थोडे नाराज झाले. ही रक्कम तशी कमी असल्याने लगेच थोडी कुजबूजही सुरु झाली.

अजितदादांनी ते ओळखले. ते पट्टीचे राजकारणी असल्याने त्यांना थोडे वाढवावे लागणार, याची कल्पना होती. त्यांनी मग दिवंगत आर. आर. पाटील यांच्या नावाचा उल्लेख करत "आबांच्या जिल्ह्यावर मी अन्याय केला, असे व्हायला नको, अजून 20 कोटी देतो, चला 300 कोटींना मंजुरी द्या', असे जाहीर केले. 

गोष्ट एवढ्यावर संपली नाही. या संधीचा फायदा घेतला तो आर. आर. आबांचे जिवलग मित्र आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी. अजितदादांनी आबांचे नाव घेतलेय म्हटल्यावर त्यांनी लगेच दादांना थांबवले आणि आबांच्या पत्नी, आमदार श्रीमती सुमनताई पाटील यांच्याकडे पाहत अनिल बाबर म्हणाले, "अजितदादा, तुम्ही आबांचे नाव घेतलेच आहे, तर वहिनी इथे आहेत. त्यांची इच्छा आहे की तुम्ही जिल्ह्याला 320 कोटीचा निधी मंजूर केला पाहिजे.'' 

बाबर यांच्या या समयसूचकतेवर अजितदादांनी हात जोडले अन्‌ म्हणाले, "हुशार आहे तुम्ही लोक. चला दिले 320 कोटी रुपये.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख