संजय शिंदेंनी आणले शिंदे, माने, कोठेंना एकाच व्यासपीठावर 

तिघांना एकसंघ ठेवणारे नेतृत्व आघाडीकडे नसल्याने फाटाफुटीचे आणि गटबाजीच्या राजकारणात भाजपने सोलापूर शहरावर ताबा मिळविला.
MLA Sanjay Shinde brought the leaders of Mahavikas Aghadi on one platform
MLA Sanjay Shinde brought the leaders of Mahavikas Aghadi on one platform

सोलापूर : राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला असला तरी सोलापुरात मात्र तो प्रयोग यशस्वी होताना दिसत नव्हता. महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत वरिष्ठांचा आदेश असूनही स्थानिक पातळीवर दोन्ही कॉंग्रेसमध्ये आघाडी होऊ शकली नव्हती, तर विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत शहर मध्य मतदार संघात एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलेले आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार दिलीप माने, महापालिकेतील विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते महेश कोठे यांना आमदार संजय शिंदे यांनी पुढाकार घेत पदवीधर व शिक्षकच्या निवडणुकीत एकाच व्यासपीठावर आणले. याशिवाय नगरसेवक तौफिक शेख यांनाही त्या व्यासापीठावर आणण्याची किमया शिंदेंनी करून दाखविली. त्याचा फायदा अरुण लाड व जयंत आसगावकर यांना झाला. 

प्रत्येक शहराचा एक रंग असतो. सोलापूरचा रंग हा भगवा आहे. पुण्याचाही रंग आता भगवा झाला आहे, असा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील सोलापुरात भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केला होता. मात्र, त्यांचा तो दावा पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून साफ धुवून निघाला आहे.

भाजपएवढीच कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सोलापूर शहरात ताकद आहे. मात्र, या तिघांना एकसंघ ठेवणारे नेतृत्व आघाडीकडे नसल्याने फाटाफुटीचे आणि गटबाजीच्या राजकारणात भाजपने सोलापूर शहरावर ताबा मिळविला. मात्र, विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतून या तिघांना करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी एकत्रित आणत ती संधी साधली आहे. यापूर्वीही त्यांनी आमदार राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक आणि भाजपचे आमदार विजयसिंह देशमुख यांच्या मदतीने सोलापूर जिल्हा परिषदेत यश मिळविले होते. 

आमदार शिंदे यांनी पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील नेत्यांच्या एकीकरणाचा नवा पॅटर्न पुढे आणला आहे. हाच पॅटर्न आगामी काळात सोलापूर जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा, महापालिका, जिल्हा परिषद व अकरा पंचायत समित्यांसाठी उपयुक्त ठरण्याची शक्‍यता आहे.

सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचीही आगामी काळात निवडणूक आहे. त्यासाठी विधान परिषदेतील हा विजय महाविकास आघाडीला टॉनिक ठरू शकतो. कारण, भाजपचा पारंपारिक बालेकिल्ल्यात मिळविलेला विजय हा महाआघाडीच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढविणारा आहे. मात्र, या निवडणुकीत बघायला मिळालेली ऐकी तीनही पक्षांना कायम ठेवावी लागणार आहे. 

ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे एकहाती नेतृत्व होते. मात्र, सक्रीय राजकारणातून ते बाजूला गेल्यानंतर जिल्हास्तरीय नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीशी निगडीत चार आमदार आहेत, तर कॉंग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी एक आमदार आहेत. पण, या सहा आमदारांपैकी एकालाही राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडीचा नेता कोण? हा प्रश्न आहे. आगामी काळात जिल्ह्यातील कोणत्या आमदारास संधी मिळते, हे पाहावे लागेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com