सिंधुदुर्ग : जिल्ह्यात राणे कुटुंबिय आणि शिवसेना खासदार यांच्यातला वाद टिपेला पोहोचला असून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमुळे जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काल (ता. १३) पासून २७ फेब्रुवारीपर्यंत मनाई आदेश लागू केले असून ठिकठिकाणी दंगल नियंत्रक पथके तैनात करण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गात राजकीय वातावरण तापले आहे. माजी खासदार निलेश राणे व सेना खासदार विनायक राऊत एकमेकांविरोधात वक्तव्ये करत आहेत. त्यातून चिथावणी घेऊन दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांच्या पुतळ्यांचे दहन करत आहेत. निवडणूक ग्रामपंचायतीची आणि टीका राणेंवर या विषयावरूनच शिवसेनेने ग्रामपंचायत पातळीवर काहीच विकासकामे केलेली नाहीत, हेच स्पष्ट होते. विनायक राऊतांनी फक्त आरोप करण्याचाच अजेंडा उचलला असून ते विकृत आहेत, अशी टीका नीलेश राणे यांनी केली होती. त्या टीकेला श्री. राऊत यांनीही उत्तर दिले.
निलेश राणे यांनी टि्वटरवरुन राऊत यांच्यावर टीका केली होती. "विन्या राऊत मीटर चोर तुझ्यासारखे सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणेंचं काहीही बिघडू शकत नाही. तुझी लायकी मातोश्रीचे बिस्कीट चोरायच्या पलीकडे नाही. बेवडा मुलगा निस्तरता येत नाही, म्हणून दुसऱ्याना बोलून काही बदलणार नाही. जनतेने काम करायला निवडून दिले आहे, राणेंवर टीका करायला नाही,'' असे ट्वीट राणे यांनी केले होते.
त्यावर "'नारायण राणेंचे राजकारणात वलय आहे. त्यांच्याबद्दल बोलताना आम्ही सुद्धा कधी एकेरी बोलत नाही. पण निलेश राणेंची भाषा असभ्य असते. खर तर राणेंच्या दोन्ही मुलांना राजकारणात यशस्वी होण्यासाठी जे लागते ते सर्व उपलब्ध होते. पण दोघांना त्याचा व्यवस्थित उपयोग करून घेता आला नाही. निलेश आणि नितेश दोघेही गुंड प्रवृत्तीचे आहेत. निलेश राणेला मतदारांनी घरी बसविले. नितेश राणेकडे चांगले गुण असल्यामुळे तो पुढे जाईल असे वाटले होते. परंतु त्यांची गुंडप्रवृत्ती त्यांना भविष्यात घरात बसवल्याशिवाय राहणार नाही. राणेंनाही खरा धोका त्यांच्या मुलांपासूनच आहे,'' असे राऊत म्हणाले होते.
या साऱ्या प्रकारानंतर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलने, निदर्शने झाली. तर शिवसेनेकडून राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे सिंधुदुर्गात राजकीय परिस्थिती तणावाची निर्माण झाली आहे. जिल्ह्यात कणकवली शहर हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखले जाते. राजकीय तणावाचे पडसाद कणकवलीत उमटू नयेत यादृष्टीने काल सकाळपासूनच शहरातील पटवर्धन चौक आणि बाजारपेठ भागात कडक पोलिस बंदोबस्त होता. तसेच दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्याही शहरात सज्ज होत्या.
Edited By - Amit Golwalkar

