..मग पडळकरांवरच गुन्हा का? दरेकरांचा सवाल - Pravin Darekar Reacts about Gopichand Padalkar | Politics Marathi News - Sarkarnama

..मग पडळकरांवरच गुन्हा का? दरेकरांचा सवाल

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

जेजुरीत जसे पुतळा उद्घाटन झाले तसे राज्यात यापूर्वी अनेक ठिकाणी अशी पुतळा आणि कार्यक्रमांची उदघाटने झाली पण त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाहीत. मग आमदार पडळकर यांच्यावर गुन्हा का दाखल झाला, असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. 

पंढरपूर : जेजुरीत जसे पुतळा उद्घाटन झाले तसे राज्यात यापूर्वी अनेक ठिकाणी अशी पुतळा आणि कार्यक्रमांची उदघाटने झाली पण त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाहीत. मग आमदार पडळकर यांच्यावर गुन्हा का दाखल झाला, असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. 

भाजप आमदार गोपींचंद पडळकर यांनी आज पहाटे जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक हे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्या होणार आहे. पडळकर यांच्या या स्टंटनंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न करताना पडळकर व त्यांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली यावरून पोलिसांनी पडळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा  तसेच पोलिसांच्या झटपट केल्याचा व जिल्हाधिकारी यांचा आदेश डावलल्याचा  गुन्हा दाखल केला आहे.अशी माहिती मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधिक्षक यांनी दिली आहे. याबाबत दरेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

दरम्यान, राज्यपालांना विमानातून उतरवण्यासाठी  मुख्यमंत्रीच जबाबदार असून त्यांनीच  प्रवास परवानगीची फाईल थांबवून ठेवल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांचा संघर्ष अद्यापही सुरूच आहे. राज्यपालांना विमानातून उतरावे लागले. यासाठी मुख्यमंत्री जबाबदार आहेत, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे.

महाविकास आघाडी मध्ये तीन वेगवेगळ्या पक्षाची मते आहेत. यांची सत्ता किती दिवस टिकणार. त्यामुळे आमच्या पक्षातून महाविकास आघाडीत कोण कशाला जाईल, असा प्रश्न दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला. पुण्यातील एका तरूणीने आत्महत्या केली यात विदर्भातील मंत्र्याचे नाव आले आहे. जर या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी होत असेल तर मुख्यमंत्र्यांनी  त्याची चौकशी करणे गरजेची आहे, असेही दरेकर म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख