दोन शिवसैनिकांच्या खूनप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक   - NCP activists arrested in murder of two Shiv Sainiks-vd83 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

दोन शिवसैनिकांच्या खूनप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक  

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

फरारी आरोपी कर्नाटक राज्यातील आळंद परिसरात लपून बसल्याची मिळाली होती. 

मोहोळ (जि. सोलापूर) : मोहोळ येथील क्षीरसागर-सरवदे या शिवसैनिकांच्या दुहेरी खून प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यात मोहोळ पोलिसांना यश आले. आळंद (कर्नाटक) परिसरातून पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. संतोष जनार्दन सुरवसे, रोहित ऊर्फ अण्णा फडतरे, पिंटू जनार्दन सुरवसे, आकाश ऊर्फ गोटू नामदेव बरकडे, संदीप ऊर्फ गोट्या सरवदे (सर्वजण रा. मोहोळ, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे असून हे मोहोळमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आहे. दरम्यान, या सर्वांना सोलापूर येथील न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना नऊ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. (NCP activists arrested in murder of two Shiv Sainiks)

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहोळ येथील सतीश क्षीरसागर आणि विजय सरवदे या शिवसैनिकांच्या दुचाकीवर संशयितांनी टेम्पो घालून 14 जुलै रोजी  घातपाताचा बनाव केला होता. यामध्ये सतीश क्षीरसागर हे जागीच ठार झाले होते, तर विजय सरवदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात मोहोळ पोलिसांनी भैया अस्वले यास ताब्यात घेऊन सुरवातीला चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान आणखी दोघांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपींची संख्या सहा इतकी झाली होती. मात्र भैया अस्वले वगळता उर्वरित पाच आरोपी पोलिसांच्या हाती लागले नव्हते. त्यामुळे आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी मृताच्या नातेवाइकांकडून पोलिस प्रशासनासमोर आक्रोश सुरू होता.

हेही वाचा : बस स्टँडसाठी ७ एकर जमीन देणारे स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार पाटसकरांचा काँग्रेसला विसर

मोहोळ पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस कर्मचारी सुरुवातीपासूनच फरारी आरोपींच्या मागावर होते. आरोपींच्या मोबाईल लोकेशनवर ते सतत नजर ठेवून होते. दरम्यान, फरारी आरोपी कर्नाटक राज्यातील आळंद परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी यापूर्वी त्या ठिकाणी जाऊन आरोपींचा शोध घेतला होता. मात्र ते मिळून आले नव्हते. 

हेही वाचा : सूर्य उगवायच्या आत तुला संपवतो 

दरम्यान, पुन्हा एकदा आरोपी आळंद परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल शरद ढावरे, पोलिस कॉन्स्टेबल गणेश दळवी, पांडुरंग जगताप, हरीश थोरात यांच्या पथकाने सोमवारी (2 ऑगस्ट) रोजी हिरोळी (ता. आळंद, कर्नाटक) येथे साध्या वेशात सापळा लावला होता. 

सायंकाळी सातच्या दरम्यान या खून प्रकरणातील संशयित फरारी आरोपी संतोष जनार्दन सुरवसे, रोहित ऊर्फ अण्णा फडतरे, पिंटू जनार्दन सुरवसे, आकाश ऊर्फ गोटू नामदेव बरकडे, संदीप ऊर्फ गोट्या सरवदे (सर्वजण रा. मोहोळ, जि. सोलापूर) त्या ठिकाणी आले. या वेळी पोलिस पथकाने गराडा घालून मोठ्या शिताफीने त्यांना पकडले. रात्री पावणेअकरा वाजता सर्व आरोपींना मोहोळ पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांना आज सोलापूर येथील न्यायालयात उभे केले असताना नऊ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

खुनाचा उलगडा होणार का? 

बनावट मतदार नोंदणी व रमाई घरकुल आवास योजनेचे प्रस्ताव गायब प्रकरणी आंदोलन केल्याने आरोपींनी संगनमताने कट करून हे हत्याकांड घडवून आणल्याचे सांगण्यात येते. मात्र, मुख्य आरोपींच्या अटकेमुळे या खून प्रकरणात आणखी कोणते कारण आहे का? याचा उलगडा होणार आहे.

मोहोळ पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांनी पोलिस निरीक्षक अशोक सायकर व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे यांच्याकडे होता. मात्र शिंदे हे सेवानिवृत झाल्याने या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यकांत पाटील करीत आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख