लाड, आसगावकरांच्या प्रचारासाठीच्या बैठकीस आमदार शिंदे, शेखर गोरे अनुपस्थित  - MLA Shinde and Shekhar Gore were absent from the meeting for the campaign of Arun Lad and jayant Asgaonkar | Politics Marathi News - Sarkarnama

लाड, आसगावकरांच्या प्रचारासाठीच्या बैठकीस आमदार शिंदे, शेखर गोरे अनुपस्थित 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

मास्क घातल्यामुळे चेहरे गंभीर दिसतात. आमच्या चेहऱ्यावरील हास्य निकालादिवशी दिसेल.

सातारा : महाविकास आघाडीचे पदवीधरचे उमदेवार अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज (ता. 21 नोव्हेंबर) बैठक घेतली. मात्र, या बैठकीला कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आणि माण खटावचे शिवसेना नेते शेखर यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीची आज चर्चा होती. 

या वेळी मंत्री देसाई यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रा. नितीन बानुगडे पाटील, सदाशिव सपकाळ, धैर्यशील कदम, रणजित भोसले, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते. 

जिल्ह्यात महाविकास आघडीतील तीनही पक्षात योग्य समन्वय आहे. त्यामुळे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्कीच यश मिळेल, असा दावाही देसाई यांनी या वेळी केला. 

""या निवडणुकीसाठी आम्ही अतिशय बारकाईने नियोजन केले आहे. तालुकानिहाय शिवसेनेचे तीन, युवा सेनेचा एक व महिला आघाडीचा एक अशी पाच जणांची समिती केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघांची उपजिल्हाप्रमुखांवर जबाबदारी दिली आहे. एकूणच जिल्ह्यावर नियंत्रण ठेवण्याचे नियोजन आम्ही केले आहे. या समितीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचण्याचे काम केले जाणार आहे. यामध्ये शहरी भागात स्वतंत्र समिती आहेत. शिवसेना पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागली आहे. या विजयात शिवसेना आपला वाटा ताकतीने उचलेल,'' असे गृह राज्यमंत्री देसाई यांनी नमूद केले. 

तुम्ही सर्व जण एकत्र असूनही कोणाच्याच चेहऱ्यावर विजयाचा विश्‍वास दिसत नाही, याचे कारण विचारले असता ते म्हणाले, "मास्क घातल्यामुळे चेहरे गंभीर दिसतात. आमच्या चेहऱ्यावरील हास्य निकालादिवशी दिसेल.'' 

आमदार महेश शिंदे आणि शेखर गोरे आजच्या बैठकीला का उपस्थित नाहीत, याबाबत विचारले असता मंत्री देसाई म्हणाले, "आमदार महेश शिंदे हे पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी मुंबईला गेले असून, शेखर गोरे आजारी आहेत. त्यामुळे ते दोघे आजच्या बैठकीस उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्याशी माझे बोलणे झालेले असून शिवसेनेत कोणतेही मतभेद नाहीत,'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख