संजय शिंदेंना सोलापूरात कुणाशी करावा लागणार छुपा संघर्ष?

राजकीयदृष्ट्या अत्यंत किचकट असलेली सोलापूर महापालिकेची मोहीम आमदार संजय शिंदे कशी पार पाडतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला कधीही १६ पेक्षा अधिक नगरसेवक विजय करता आले नाहीत. महापालिकेच्या प्रचारात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे येऊन देखील राष्ट्रवादीला फारशी भरीव कामगिरी करता आली नाही. मुठभर राष्ट्रवादीत ढीगभर गटबाजी असल्याने येथील राष्ट्रवादीत सहजासहजी ताळमेळ होताना दिसत नाही.
Sanjay Shinde - Praniti Shinde
Sanjay Shinde - Praniti Shinde

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील शांत, संयमी आणि कोणाचाही राजकीय हिशोब अंगावर न ठेवणारा नेता म्हणून करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांची ओळख आहे. जिल्हा बॅंक, जिल्हा दूध संघ, विधानपरिषदेची निवडणूक, जिल्हा परिषद आणि करमाळ्याची मोहिम फत्ते करुन आमदार शिंदे यांनी आता सोलापूर महापालिकेकडे मोर्चा वळविला आहे. सोलापूर शहरातील राजकिय व सामाजिक घटना घडामोडींमध्ये ते प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे सहभाग घेऊ लागले आहेत.

सोलापूर महापालिकेच्या प्रश्‍नात आणि राजकारणात त्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत किचकट असलेली सोलापूर महापालिकेची मोहीम आमदार संजय शिंदे कशी पार पाडतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला कधीही १६ पेक्षा अधिक नगरसेवक विजय करता आले नाहीत. महापालिकेच्या प्रचारात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे येऊन देखील राष्ट्रवादीला फारशी भरीव कामगिरी करता आली नाही. मुठभर राष्ट्रवादीत ढीगभर गटबाजी असल्याने येथील राष्ट्रवादीत सहजासहजी ताळमेळ होताना दिसत नाही. 

महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएममधील तोफिक शेख यांच्यासह सहा नगरसेवकांना व शिवसेनेच्या महेश कोठे यांना आपल्या सोबत ठेवण्यात राष्ट्रवादीने प्रयत्न सुरु केले आहेत.एमआयएम नगरसेवक व महेश कोठे यांच्या प्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी आहे. कोठे आणि शेख यांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी आमदार शिंदे यांनी शेवटच्या टप्प्यात बजावलेली भूमिका महत्वाची मानली जाते.

महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेले हे दोन प्रयत्न राजकीयदृष्ट्या उपयुक्त मानले जात आहेत. ग्रामीणमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशी आमदार संजय शिंदे यांनी राजकीय संघर्ष केला. सोलापुरात मात्र त्यांचा सामना भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख व सुभाष देशमुख यांच्याशी थेट तर आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी छुप्या पध्दतीने होण्याची शक्‍यता आहे.

महाविकास आघाडी सरकार म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी त्यांना वरकरणी जुळतेही घ्यावे लागेल. परंतु, सोलापूरात राष्ट्रवादीची अधोगती होण्यास असलेल्या महत्वाच्या कारणांमध्ये कॉंग्रेस हे देखील एक कारण आहे. सोलापूरच्या ग्रामीण भागाचे नेतृत्व तत्कालीन मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी तर शहराचे नेतृत्व तत्कालीन मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी करायचे, असा अलिखित करारच शिंदे व मोहिते यांच्यामध्ये होता. त्यामुळे नेहमी सत्तेत असलेल्या मोहिते-शिंदे यांच्यात फारशी वादावादी नव्हती आणि असली तरीही ती वादावादी चव्हाट्यावर येत नव्हती. 

भाजप सरकारमध्ये मात्र विजयकुमार देशमुख व सुभाष देशमुख या दोन्ही मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच गटबाजी बघायला मिळाली. महाविकास आघाडी सरकारमध्ये मात्र जिल्ह्याला मंत्रीपद न मिळाल्याने सध्या गटबाजीच्या फारशा घडामोडी उघडपणे घडताना दिसत नाहीत. आमदार संजय शिंदे यांनी सोलापूर शहरात लक्ष घातल्याने आगामी काळात मात्र संघर्षाची ठिणगी पडण्याची दाट शक्‍यता आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com