परिचारकांनी ४१ वर्षांपूर्वींचा डाव पुन्हा टाकला अन्‌ काकांच्या पराभवाचे उट्टे काढले - MLA Prashant Paricharak avenged the defeat of Kaka Sudhakar Pant Paricharak | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

परिचारकांनी ४१ वर्षांपूर्वींचा डाव पुन्हा टाकला अन्‌ काकांच्या पराभवाचे उट्टे काढले

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 3 मे 2021

सुधाकरपंत परिचारक यांचा झालेला पराभव हा प्रशांत परिचारक यांच्या जिव्हारी लागला होता.

पंढरपूर : राजकारणात कोणतीही गोष्ट गृहीत धरून चालत नाही, याचा प्रत्यय पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या निकालाने दिला. भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे लागलेल्या पोटनिवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर सहज मैदान मारू, असे वाटणाऱ्यांना जनतेने जमिनीवर आणले. पण, त्यासाठी पंढरपूर तालुक्यातील प्रबळ राजकीय घराणे असलेल्या परिचारक गटाने दोन पावले मागे घेत आपली ताकद समाधान आवताडे यांच्या पाठीशी उभी करत निर्णायक दणका दिला. त्यात भलेभले घायाळ झाले. विधानसभेची १९८० ची निवडणूक सुधाकरपंत परिचारक यांनी न लढविता इंदिरा कॉंग्रेसचे उमेदवार पांडुरंग डिंगरे यांच्या पाठीशी ताकद उभी करत जिल्ह्यातील बडे प्रस्थ असलेल्या औदुंबरअण्णा पाटील यांचा पराभव घडविला. तोच कित्ता सुधाकरपंतांचे पुतणे आमदार प्रशांत परिचारक यांनी गिरवला आणि काका सुधाकरपंतांच्या २०१९ च्या निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढले. 

राज्य सरकारमधील बडे मंत्री आणि वडिलांच्या निधनाच्या सहानुभूतीच्या जोरावर पंढरपूर पोटनिवडणुकीत भगिरथ भालके हे सहज निवडून येतील, असा सुरुवातीला सर्वांचा अंदाज होता. तो मतदानाच्या अगोदरच्या दोन दिवसांपर्यंत होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांच्यात घडवून आणलेल्या समेटच्या ताकदीचा कोणालाही अंदाज आला नाही. प्रशांत परिचारक यांचे सूक्ष्म नियोजन कामी आले आणि आवताडे यांचे आमदार होण्याचे स्वप्न साकार झाले. पण, त्यासाठी परिचारक यांनी आपले काका सुधाकरपंत परिचारक यांनी १९८० च्या निवडणुकीत शिकवलेला धडा या पोटनिवडणुकीत प्रत्यक्षात आणला आणि पुन्हा चमत्कार घडवून दाखवला.  

काय झाले होते १९८० च्या निवडणुकीत

कॉंग्रेसचे उमेदवार औदुंबरअण्णा पाटील यांना विधानसभेच्या 1978 च्या निवडणुकीत 39 हजार 205 मते मिळाली होती, तर तत्कालीन जनता पार्टीचे उमेदवार असलेले सुधाकरपंत परिचारक यांनी 35 हजार 543 एवढी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. पंतांची ती पहिलीच निवडणूक होती. तरीही त्यांचा अवघ्या ३६६२ मतांनी पराभव झाला होता. पण त्यांनी जिल्ह्यातील बडे राजकीय प्रस्थ असलेले औदुंबरअण्णा पाटील यांना घाम फोडला होता. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांनंतर म्हणजे 1980 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र चमत्कार घडला. कॉंग्रेस पक्षातील फाटाफुटीनंतर इंदिरा कॉंग्रेसची उमेदवारी पांडुरंग डिंगरे यांना मिळाली, तर कॉंग्रेसची (यू) उमेदवारी औदुंबरअणा पाटील यांना मिळाली. 

त्या वेळी डिंगरेंच्या पाठीशी ताकद लावली 

सुधाकरपंत परिचारक यांनी आपली संपूर्ण ताकद डिंगरे यांच्या पाठीशी उभा केली. सोप्या वाटणाऱ्या या लढतीत औदुंबर पाटील यांचा 3199 मतांनी डिंगरे यांनी धक्कादायकरित्या पराभव केला. त्याला परिचारक गटाची ताकद कारणीभूत होती. त्यानंतर 1985 च्या निवडणुकीत सुधाकरपंत परिचारक हे कॉंग्रेसच्या चिन्हावर लढले आणि   आमदार झाले. पंढरपूरची आमदारकी त्यांच्याकडे तब्बल 2009 पर्यंत होती. 

तेव्हा सुधाकरपंत; आता प्रशांत परिचारक

या पोटनिवडणुकीतही तीच स्थिती होती. प्रबळ ताकद असूनही प्रशांत परिचारक यांनी माघार घेत आवताडे यांच्या पाठीशी ताकद लावली आणि १९८० च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती केली. वास्तविक राज्य सरकारमधील मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ताकद भगिरथ भालके यांच्या पाठीशी होती. तसेच, आमदार भारतनाना भालके यांनी केलेली विकासकामे आणि सर्वसामान्यांसाठी खिशात हात घालण्याची त्यांची खासियत, यामुळे भगिरथ हे सहज निवडून येतील, अशी परिस्थिती होती. मात्र, जसजसी निवडणूक पुढेपुढे सरकू लागली तसतशी रंगत वाढत गेली. आमदार परिचारक यांचे नियोजन आणि त्याला त्यांचे बंधू उमेश परिचारक व कार्यकर्त्यांनी उत्तम अंमलबजावणीतून दिलेली साथ यामुळे राज्यात बलाढ्य असणाऱ्या राष्ट्रवादीला धोबीपछाड दिली.

तो पराभव जिव्हारी

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत सुधाकरपंत परिचारक यांचा झालेला पराभव हा प्रशांत परिचारक यांच्या जिव्हारी लागला होता. तो त्यांनी अनेकवेळा बोलून दाखवला होता. त्याचे उट्टे काढण्यासाठी काकांनी शिकवलेला डाव हेरून प्रशांत परिचारक यांनी आवताडे यांच्या पाठीशी ताकद लावली. एवढेच नाही तर जाहीर सभेत आव्हान दिले की ‘विरोधकांना मी पंढरपुरात रोखून धरतो, तुम्ही (मंगळवेढेकर) लीड द्या, आवताडे कसे आमदार होत नाहीत, ते बघूच.’  त्यानुसार सभेत दिलेला शब्द पाळत त्यांनी आवताडे यांना पंढरपूर तालुक्यातन आघाडी मिळवून दिली.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख