भाजप खासदार महास्वामींच्या दाखल्याचा प्रश्‍न अन्‌ प्रणिती शिंदेंचे स्मित हास्य ! 

हा विषय न्यायालयात असल्याचे उत्तर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सचिव छाया गाडेकर यांनी दिले.
MLA Praniti Shinde reviewed the functioning of Solapur District Caste Certificate Verification Committee
MLA Praniti Shinde reviewed the functioning of Solapur District Caste Certificate Verification Committee

सोलापूर : सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कामकाजाचा आढावा विधानमंडळाच्या अनुसुचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी आज (ता. 26 फेब्रुवारी) घेतला. कॉंग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करुन विजयी झालेले भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जातीच्या दाखल्याबाबत कॉंग्रेस कार्यकर्ते दिनेश म्हेत्रे यांनी या बैठकीत प्रश्‍न उपस्थित केला. हा विषय न्यायालयात असल्याचे उत्तर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सचिव छाया गाडेकर यांनी दिले. या प्रश्‍नोत्तरात आमदार प्रणिती शिंदे यांनी फक्त स्मित हास्य करत या विषयावर बोलणे टाळले. 

सोलापुरातील सात रस्ता येथील सामाजिक न्याय भवनात आज (ता. 26 फेब्रुवारी) या समितीची बैठक झाली. या प्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त कैलास आढे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त छाया गाडेकर, महापालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे यांच्यासह इतर अधिकारी व महापालिकेचे नगरसेवक उपस्थित होते. 

अनुसुचित जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमातील पीडितांना लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाची योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीच्या दाखल्याची आवश्‍यकता आहे. जातीचा दाखला नसल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित राहू लागली आहेत. शाळेच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख असल्याने जातीच्या दाखल्याऐवजी शाळेचा दाखला ग्राह्य धरावा, अशी शिफारस राज्य सरकारला करण्यात येणार असल्याची माहिती आमदार शिंदे यांनी दिली. 

सोलापूर जिल्ह्यात 2019-20 या वर्षात जातीच्या दाखल्यांअभावी 53 तर जानेवारी 2020 ते मार्च 2020 या कालावधीत 143 प्रकरणे प्रलंबित आहेत. ऍट्रोसिटीतील पिडितांना अर्थसहाय्य मिळण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्याने एफआयआरची प्रत, जातीचा दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र व दोषारोप पत्र सामाजिक न्याय विभागाला सादर करणे आवश्‍यक आहे. जातीचा दाखला नसल्याने अनेक प्रकरणे मार्गी लागत नसल्याचा मुद्दा या बैठकीत चर्चेला आला. त्यानंतर समिती अध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी याबाबतची शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सतरा नंबरचा फॉर्म भरुन दहावी व बारावीचे शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गिय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही. ज्यांची आर्थिक स्थिती बिकट असलेले अनेक विद्यार्थी या पध्दतीने शिक्षण घेतात. शासनाने अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती व इतर योजनांचा लाभ द्यावा. यासाठी समिती सरकारकडे शिफारस करेल. 
- प्रणिती शिंदे, आमदार तथा अध्यक्षा, विधानमंडळाच्या अनुसुचित जाती कल्याण समिती 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com