कोल्हापूरसह राज्यातील आमदार शिवसेनेच्या संपर्कात : उदय सामंत - Many MLAs in State are in contact with Shivsena Claims Uday Samant | Politics Marathi News - Sarkarnama

कोल्हापूरसह राज्यातील आमदार शिवसेनेच्या संपर्कात : उदय सामंत

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

कोल्हापूरसह राज्यातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. अनेकांनी निवडणुकीच्या काळात गद्दारी केली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना तोडीस तोड उत्तर देऊन धडा शिकवावा असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले

सातारा  : कोल्हापूरसह राज्यातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. अनेकांनी निवडणुकीच्या काळात गद्दारी केली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना तोडीस तोड उत्तर देऊन धडा शिकवावा. सातारा जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांनी असे काम करावे की त्याची दखल इतर पक्षांनी घ्यावी, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या. जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून माझी निवड झाली. त्याची प्रचिती अवघ्या तीन महिन्यांत कामातून दिसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

साताऱ्यात झालेल्या या बैठकीस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, आमदार महेश शिंदे, सदाभाऊ सपकाळ, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, जयवंत शेलार, चंद्रकांत जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख रणजित भोसले, महिलाप्रमुख शारदा जाधव, अनिता जाधव, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, एस. एस. पार्टे, अजित यादव, प्रताप जाधव उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, "सातारा जिल्ह्यात शिवसेना वाढली पाहिजे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी कोणाचीही शिफारस गरजेची नाही. शिवसेना वाढवण्यासाठी गावागावांत शाखा असल्या पाहिजेत. दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडा. माझ्या नियुक्तीमुळे कोणत्याही पदाधिकाऱ्यांना त्रास होणार नाही. संघटनेच्या भल्यासाठीच मी रत्नागिरीतून साताऱ्यात आलो आहे. माझ्याकडे उच्च व तंत्र शिक्षण खाते असल्याने त्याचा फायदा युवा सेनेने जिल्ह्यातील युवकांपर्यंत पोचविला पाहिजे. लवकरच जिल्हा प्रशासन आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक लावून विकासाच्या दृष्टीने चर्चा करू.''

मंत्री देसाई म्हणाले, ''जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी काम सुरू आहे. एका दिवसात तब्बल ४४८ गावांत शिवसेना शाखा सुरू करण्यात आल्या. मी अर्धा मंत्री आहे, तर श्री. सामंत हे पूर्ण मंत्री आहेत. त्यामुळे मी रेटून काम करत आहे.'' सातारा हा सहकाराची पंढरी म्हणून ओळखली जात आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सहकार क्षेत्रात शिरकाव करावा. जिल्ह्यावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवावा, असे आवाहन नितीन बानगुडे पाटील यांनी केले.

महेश शिंदे म्हणाले, ""दोन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणुका आल्याने आता ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची आहे. गावात एक जरी कार्यकर्ता असला तरी त्याने पॅनेल टाकणे गरजेचे आहे. राजकारणात यशस्वी होण्यासाठी पहिली ग्रामपंचायत आपल्या ताब्यात असली पाहिजे.'' यशवंत घाडगे यांनी प्रास्ताविक केले, तर शारदा जाधव यांनी आभार मानले.

शेखर गोरेंना निमंत्रणच नाही
माण-खटाव मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारीवर विधानसभा लढलेले शेखर गोरे यांना बैठकीचे निमंत्रणच दिलेले नव्हते. याबाबत पत्रकारांनी श्री. सामंत यांना विचारले असता त्यांनी "काही त्रुटी राहिल्या असतील, काही ठिकाणी मतभेद असतीलही. ते निवांतपणे सोडविले जातील. सर्व जण शिवसैनिक म्हणून आगामी काळात काम करतील. सर्वांचा समन्वय राखला जाईल,'' असे त्यांनी सांगत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख