पालकमंत्री भरणेंचा वेळकाढूपणा...राष्ट्रवादीला गोत्यात आणणार? - Mahavikas Aghadi on the backfoot due to the role of Guardian Minister Dattatraya Bharane | Politics Marathi News - Sarkarnama

पालकमंत्री भरणेंचा वेळकाढूपणा...राष्ट्रवादीला गोत्यात आणणार?

प्रमोद बोडके
बुधवार, 12 मे 2021

या प्रश्नांमध्ये महाविकास आघाडीला दोन पावले मागे सरकावे लागत आहे.

सोलापूर : एखाद्या राजकीय पक्षात समन्वय असल्यास त्याचे सकारात्मक परिणाम कसे दिसतात? याचे उत्तम उदाहरण म्हणून सध्या सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाकडे (Bharatiya Janata Party) पाहिले जात आहे. सोलापुरातील भाजप नेत्यांची एकजूट जिल्ह्यासाठी आणि पक्षासाठीही महत्त्वपूर्ण ठरू लागली आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) सत्तेत असूनही सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये मात्र विसंवाद दिसत आहे. सत्ताधारी आमदारांमध्येच समन्वयाचा अभाव असल्याने कोरोना (Corona) उपाय योजना आणि उजनी धरणाचे (Ujani dam) पाणी या प्रश्नांमध्ये महाविकास आघाडीला दोन पावले मागे सरकावे लागत आहे. (Mahavikas Aghadi on the backfoot due to the role of Guardian Minister Dattatraya Bharane)
 
सोलापूर जिल्ह्यातून एकेकाळी भाजपचे एक किंवा दोन आमदार विजयी होत होते. गेल्या काही वर्षांमध्ये सोलापूर जिल्ह्यात भाजपने दमदार कामगिरी केली आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून माढा आणि डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या माध्यमातून सोलापूरची खासदारकी भाजपकडे आहे. विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, राजेंद्र राऊत आणि समाधान आवताडे यांच्या माध्यमातून विधानसभेचे सहा आमदार भाजपचे आहेत. प्रशांत परिचारक आणि रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषदेचे  दोन आमदार जिल्ह्यात आहेत.

दोन खासदार आणि आठ आमदारांची भाजपची टीम सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा चेहरा बनू पाहत आहे. कोरोना कालावधीत सोलापूर जिल्ह्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा विषय असो की इंदापूरसाठी नेण्यात येत असलेल्या पाच टीएमसी पाण्याचा विषय यामध्ये भाजपची एकजूट जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरू लागली आहे. जिल्ह्याच्या अस्मितेच्या या दोन महत्त्वाच्या प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सध्या तरी सरस होत आहे.

हेही वाचा : राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार; सुरक्षित असल्याचा निर्वाळा

महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव

सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे पाच आमदार आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बबनदादा शिंदे, यशवंत माने, करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे, शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील आणि काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रश्न असो की उजनीतून पाच टीएमसी पाणी नेण्याचा विषय या दोन्ही महत्त्वांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये समन्वय व एकजूट दिसत नाही.

जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या आजी-माजी आमदारांना व प्रामुख्याने नेत्यांना विश्वासात घेऊन कोरोना विरुद्धची लढाई असो की उजनीच्या पाण्याचा प्रश्न यामध्ये पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी वेळीच ठोस भूमिका बजावायला हवी होती. परंतु पालकमंत्री भरणे यांच्या वेळकाढू भूमिकेमुळे उजनीच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. त्यातून पालकमंत्री भरणे व राष्ट्रवादी काँग्रेसही सोलापूर जिल्ह्याच्या विरोधात असल्याची जनभावना तयार होऊ लागली आहे. त्याचे मोठे दुष्परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी काळात सोसावे लागण्याची शक्यता आहे. 

भरणेंना मिळेना स्वकीयांची साथ

सोलापूरसारखा राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेला जिल्हा हाताळण्यात पालकमंत्री दत्तात्रय भरणे अपयशी ठरू लागले आहेत. कोरोनाचे संकट, उजनीच्या पाण्याचा प्रश्न, सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यात व सोलापूरचा कारभार पाहण्यासाठी पालकमंत्री भरणे यांची ताकद आणि अनुभव कमी पडू लागला आहे.

भरणे यांनी जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांना कोरोना आणि पाणीप्रश्नात विश्वासात न घेतल्याने जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेतेही आज पालकमंत्री भरणे यांच्यासोबत नाहीत. या दोन्ही महत्त्वाच्या प्रश्नात पालकमंत्री भरणे आज एकटे पडले आहेत. स्वपक्षीयांचीही साथ त्यांना मिळताना दिसत नाही. 

आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसण्याची भीती

आगामी काळात सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समित्या, महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधान परिषदेची निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांमध्ये पालकमंत्री भरणे यांच्या बाबतीत तयार होत असलेले अविश्वासाचे वातावरण महाविकास आघाडीसाठी धोक्याचे मानले जात आहे. 

 जिल्ह्याला हक्काचे पालकत्व द्या 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या एकाही आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. सरकार स्थापन होताना महाविकास आघाडीचे सहा आमदार जिल्ह्यात होते तरीदेखील सोलापूर जिल्हा मंत्रीपदापासून वंचित राहिला. बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्र्यांकडे सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली.

आगामी काळात मंत्रिमंडळाची पुनर्रचना झाल्यास सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांपैकी एकाची मंत्रिमंडळात वर्णी लावावी आणि सोलापूर जिल्ह्याला हक्काचे पालकत्व द्यावे, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख