जोपर्यंत भाजप आहे; तोपर्यंत एमआयएम राहणार : प्रणिती शिंदे  - As long as the BJP is; Until then, MIM will remain: Praniti Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

जोपर्यंत भाजप आहे; तोपर्यंत एमआयएम राहणार : प्रणिती शिंदे 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 27 मार्च 2021

सोलापूर महानगरपालिकेत सत्ताबदल घडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे.

सोलापूर : "महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगले काम करीत आहेत. सर्व व्यवस्थित सुरू असतानाच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, ही विरोधी भारतीय जनता पक्षाची मागणी निरर्थक आहे. अधिकाऱ्यांना केंद्रातील भाजप सरकारचा पाठिंबा असून त्याशिवाय हे होऊ शकत नाही,'' असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी विरोधकांवर केला. 

सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे शनिवारी (ता. 27 मार्च) आयोजित वार्तालापात आमदार शिंदे बोलत होत्या. महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी, तसेच महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि केरळ विधानसभा निवडणुकीतील उमेदवार निवडीसाठी कॉंग्रेसच्या छाननी समितीतही त्यांचा सहभाग झाल्याबद्दल पत्रकार संघातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी प्रास्ताविक केले. 

हेही वाचा  :  पंढरपुरात राष्ट्रवादीला 2019 च्या पुनरावृत्तीची भीती; एबी फॉर्म कोणाला मिळणार 

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, कॉंग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, कार्यकर्त्यांना ताकद देणे आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यावर आपण भर देणार आहोत. राज्यभरात जिल्हा व तालुकानिहाय कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. मागासवर्गीयांच्या विकासासाठी त्यांच्या हक्‍काचा निधी खर्च व्हावा, याकडेही लक्ष दिले जाईल. वीजबिल माफ झाले पाहिजे, महिलांवरील अत्याचार थांबावेत, यासाठी आपण नेहमी आग्रही राहणार आहोत. त्याचबरोबर पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ झाल्याने केरळमध्ये सत्तांतर घडून कॉंग्रेसला सत्ता मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

"सन 2014 पासून आतापर्यंत एमआयएममुळे कॉंग्रेसला मिळणाऱ्या मताची विभागणी झाली आहे. भाजपचे तसे धोरण असून जोपर्यंत भाजप आहे, तोपर्यंत एमआयएम राहील,'' असे प्रणिती शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले. 

सोलापूर महानगरपालिकेत सत्ताबदल घडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. आगामी निवडणुकीत सोलापूर महापालिकेवर कॉंग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल, असा विश्‍वासही आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला. 

मागील लॉकडाउनमध्ये गोरगरिबांचे झालेले हाल पाहता आता लॉकडाउन होणार नाही. मात्र, कोरोनापासून बचाव होण्यासाठी मास्क हा एकमेव उपाय असल्याचे सांगून गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहनही प्रणिती शिंदे यांनी या वेळी नागरिकांना केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख