पवारांवर टीका करणाऱ्या आमदार पाटलांना उपरती : आघाडीच्या प्रमुखांवर रागावणे हा आमचा अधिकारच - It is our right to be angry and criticize the heads of the Mahavikas Aghadi government : Shahaji Patil | Politics Marathi News - Sarkarnama

पवारांवर टीका करणाऱ्या आमदार पाटलांना उपरती : आघाडीच्या प्रमुखांवर रागावणे हा आमचा अधिकारच

दत्तात्रेय खंडागळे 
बुधवार, 19 मे 2021

मुख्यमंत्र्यांच्या पक्षातीलच एका आमदाराने शरद पवारांवर टीका केल्यामुळे विरोधकांच्याही भूवया उंचावल्या होत्या.

सांगोला (जि. सोलापूर) : उजनी धरणाच्या (Ujani dam) पाण्यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करणारे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (MLA Shahaji Patil) यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उजनीतून इंदापूरला पाच टीएमसी पाण देण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर पाटील यांना उपरती सुचली आहे. शरद पवार हे आमच्यासाठी मार्गदर्शकच असून महाविकास आघाडी सरकारच्या कुटुंबातील प्रमुख नेते आहेत. सांगोलासारख्या दुष्काळी भागातील सिंचन योजना प्रलंबित असताना इंदापूरसाठी उजनीतून पाणी नेणे योग्य नसल्याने मी तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठीच पवारसाहेबांवर टीका केली होती. मी राजकीय दृष्टिकोनातून टीका केली नसून घरातील माणसांवर रागावणे, टीका करणे हा आमचा अधिकारच आहे, अशी भूमिका सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी मांडली. (It is our right to be angry and criticize the heads of the Mahavikas Aghadi government : Shahaji Patil)

उजनी धरणाच्या पाण्यावरून सोलापूर जिल्ह्यातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून सोलापूरचे चांगलेच तापले होते. भाजपने विरोधाचा भूमिका घेतलेली असतानच महाविकास आघाडी प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी थेट शरद पवारांवर टीकास्त्र सोडत उजनीचे पाणी इंदापूरला नेल्यास सोलापूर जिल्ह्यात रक्तरंजित आंदोलन होईल, असा इशारा दिला होता. तसेच, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या विचाराचे सरकार राज्यात ज्या ज्या वेळी आले, तेव्हा तेव्हा त्यांनी फक्त बारामतीचा विकास केलेला आहे. बारामतीला सगळा निधी मिळवून द्यायचा आणि बारामती हे विकास मॉडेल आहे, असे देशभर सांगायचे, ही पवारांची राजकीय पद्धत आहे अशीही टीका आमदार पाटील यांनी केली होती. 

हेही वाचा : उजनीचे पाणी पळविणारे खरे सूत्रधार अजित पवार...? शब्द फिरवण्यात पटाईत
 

पवारांवर केलेल्या टीकेमुळे सोलापूर जिल्ह्यासह राज्यात शहाजी पाटील यांची चर्चा सुरू होती. मुख्यमंत्र्यांच्या पक्षातीलच एका आमदाराने शरद पवारांवर टीका केल्यामुळे विरोधकांच्याही भूवया उंचावल्या होत्या. परंतु इंदापूरसाठी उजनीतून जाणाऱ्या पाण्याचा आदेश जलसंपदा विभागाने रद्द करताच शहाजीबापू पाटील यांनी नरमाईची भूमिका घेतली. 

सांगोल्याच्या हक्कासाठी टीका केली

गेल्या अनेक वर्षापासून दोन टीएमसी पाण्यासाठी सांगोल्याची जनता तहानलेली आहे. येथील अनेक प्रश्न प्रलंबित असताना दुष्काळी सांगोल्यातील पाणीप्रश्नावर लक्ष देणे गरजेचे होते. शरद पवार खासदार असतानाच त्यांनी या प्रलंबित योजनांना प्राधान्याने निधी उपलब्ध करुन योजना पूर्ण करणे महत्त्वाचे होते. परंतु उजनीचे पाणी इंदापूरला नेल्यामुळे तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी मी शरद पवारांवर टीका केली होती. सांगोल्याच्या हक्काच्या पाण्यासाठी मी अशी भूमिका घेतली होती. परंतु पवारसाहेब हे महाविकास आघाडीचे प्रमुख असल्याने आमच्यावर झालेल्या अन्यायासाठी टीका-टिप्पणी करणे हा माझा अधिकारच आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांनी सर्वसमावेशक राजकारण करण्याची गरज असल्याचेही शेवटी आमदार पाटील यांनी सांगितले.

टिकटिप्पणी करून राजकीय लाभ घेण्याचा हेतू नाही

दुष्काळी सांगोला तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळवणे व प्रलंबित पाणी योजना पूर्ण करणे माझा मुख्य हेतू आहे. कोणावर टीकाटिपणी करून राजकीय लाभ घेण्याचा माझा कोणताही हेतू नसून तालुक्याला प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी निधी मिळवणे हाच माझा मुख्य उद्देश आहे, असे आमदार शहाजी पाटील यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख