हायकोर्टाच्या नोटिशीनंतर माने आक्रमक; क्षीरसागरांच्या जात प्रमाणपत्राच्या चौकशीची मागणी - Inquire about the caste certificate of Shiv Sena leader Somesh Kshirsagar : Hanumant Mane | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

हायकोर्टाच्या नोटिशीनंतर माने आक्रमक; क्षीरसागरांच्या जात प्रमाणपत्राच्या चौकशीची मागणी

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 2 जुलै 2021

या बाबीची माहिती प्रांताधिकाऱ्यांना न देता बनावट कागदपत्रांच्या आधारे दुबार जात प्रमाणपत्र मिळविले आहे.

मोहोळ (जि. सोलापूर) : मोहोळचे शिवसेना नेते सोमेश क्षीरसागर व त्यांच्या कुटुंबीयांचे जातीचे प्रमाणपत्र हे समितीने व सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. असे असतानाही त्यांनी दुसरे नवीन जातीचे दाखले काढून वैधता प्रमाणपत्र मिळविले आहे. सोमेश क्षीरसागर यांनी हिंदू खाटीक जातीचे दुबार जात प्रमाणपत्र चुकीच्या मार्गाने मिळवून त्याची वैधताही मिळवली आहे. त्यामुळे क्षीरसागर यांच्या जात वैधता प्रमाणपत्राची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे आणि राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार यशवंत माने यांचे बंधू हनुमंत माने यांनी जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रारी अर्जाद्वारे केली आहे. (Inquire about the caste certificate of Shiv Sena leader Somesh Kshirsagar : Hanumant Mane)

या बाबत सोलापूर जिल्हा परिषद सदस्य सोनवणे व आमदार यशवंत माने यांचे बंधू हनुमंत माने यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, सोमेश क्षीरसागर यांचे जात प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याची माहिती त्यांनी प्रशासनापासून लपवून ठेवली आहे. तसेच, या बाबीची माहिती प्रांताधिकाऱ्यांना न देता बनावट कागदपत्रांच्या आधारे दुबार जात प्रमाणपत्र मिळविले आहे. त्यानंतर चुकीच्या मार्गाने जातवैधता प्रमाणपत्रही मिळवले आहे. 

हेही वाचा : आमदार यशवंत मानेंना धक्का : जातप्रमाणपत्राप्रकरणी आठवड्यात म्हणणे मांडण्याची नोटीस 

वास्तविक पाहता पहिले जात प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टाने रद्द केले असल्याचे माहित असतानाही दुसऱ्या जात प्रमाणपत्राला जात पडताळणी समितीने वैधता दिली आहे. दक्षता पथक चौकशी अधिकाऱ्यांशी संगनमत करून एकतर्फी वैधता आदेश समितीने पारित केला आहे, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोनवणे आणि माने यांनी केली आहे. या तक्रार अर्जावर जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे आणि आमदार यशवंत माने यांचे बंधू हनुमंत माने यांच्या सह्या आहेत. 

राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने व शिवसेनेचे विधानसभेचे पराभूत उमेदवार नागनाथ क्षीरसागर पुन्हा एकदा जातप्रमाणपत्राच्या सत्यतेसाठी न्यायालयीन लढाईसाठी समोरासमोर उभे टाकले आहेत. कोण खरे आणि कोण खोटे याचा अंतिम निकाल काय असेल, यांची उत्सुकता व चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

यशवंत मानेंना उच्च न्यायालयाची नोटीस

दरम्यान, आमदार यशवंत माने यांच्या जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्रावर मुंबई उच्च न्यायालयाने दोन याचिका स्वीकारल्या आहेत. न्यायालयाने आमदार माने यांना नोटीस काढली असून त्यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी येत्या 12 जुलैला सुनावणी होणार आहे. याप्रकरणी सोमेश क्षीरसागर यांनी दाखल केलेल्या याचिकेत आमदार यशवंत माने व त्यांचे भाऊ हणमंत माने, सोपान माने, त्यांची पुतणी सुजाता माने हे वकिलामार्फत न्यायालयात हजर झाले असून एका आठवड्यात त्यांना उच्च न्यायालयात आपली बाजू प्रतिज्ञापत्राने मांडावी लागणार आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख