मुश्रीफांच्या कार्यकर्त्याची राष्ट्रवादीच्या अरुण लाड यांच्याविरोधात बंडखोरी? - Hasan Mushrif's activist rebels against NCP's Arun Lad? | Politics Marathi News - Sarkarnama

मुश्रीफांच्या कार्यकर्त्याची राष्ट्रवादीच्या अरुण लाड यांच्याविरोधात बंडखोरी?

सुनील पाटील 
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

या सर्व घडामोडीवर हसन मुश्रीफ काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे.

कोल्हापूर : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक भैया माने यांनीही चार दिवसांपूर्वी पदवीधर मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेल्या अरुण लाड यांच्याविरुद्ध माने निवडणूक लढवणार की उमेदवारी अर्ज माघार घेणार? या कडे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, या सर्व घडामोडीवर हसन मुश्रीफ काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे. मुश्रीफ माने यांना माघार घेण्यास भाग पाडतात की त्यांना अप्रत्यक्षरित्या रसद पुरवितात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे. 

भैया माने हे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खंदे पदाधिकारी आणि कोल्हापूर जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक असणाऱ्या भैया माने यांनीही पुणे पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळावी, या साठी फिल्डिंग लावली होती. पक्षश्रेष्ठी आपल्यावर विश्‍वास दाखवून पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीची संधी देतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. 

पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अरुण लाड, श्रीमंत कोकाटे, उमेश पाटील आणि भैया माने इच्छुक होते. त्यांच्यापैकी सांगली येथील अरुण लाड यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे लाड यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे. 

उमेदवारीत डावलल्याने श्रीमंत कोकाटे यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात "आता माघार नाही,' म्हणून आपली निवडणूक लढविण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. 

दुसरीकडे, मुश्रीफ यांचे खंदे समर्थक भैया माने यांनी चार दिवसांपूर्वीच उमेदवारी अर्ज भरला आहे. माने हे आपला उमेदवारी अर्ज माघार घेणार की अपक्ष निवडणूक लढवणार या कडे लक्ष लागले आहे. भैया माने यांनीही या निवडणुकीसाठी जय्यत तयार केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तिकिट मिळाल्यानंतर प्रचार आणि पदवीधरांपर्यंत पोचण्यासाठी नियोजन केले आहे. आता त्यांच्या उमेदवारी अर्जावरच त्यांची पुढील दिशा ठरणार असल्याचे चित्र आहे. 

माने यांच्याबरोबरच मुश्रीफ यांच्या भूमिकेकडेही लक्ष असणार आहे. कारण, मुश्रीफ हे आपले कार्यकर्ते माने यांना उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला भाग पाडतात की त्यांना प्रोत्साहन देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख