चंद्रकांतदादा खुळ्यासारखं काहीही बडबडत आहेत : मुश्रीफ  - Hasan Mushrif criticizes Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांतदादा खुळ्यासारखं काहीही बडबडत आहेत : मुश्रीफ 

सुनील पाटील 
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

चंद्रकांत पाटील मानसिक संतुलन ढासळल्यासारखे वक्तव्य करत आहेत.

कोल्हापूर : महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मानसिक संतुलन ढासळल्यासारखे वक्तव्य करत आहेत, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. त्यामुळेच पाटील डोक्‍यावर परिणाम झाल्यासारखं खुळ्यासारखं बडबडत आहेत, असा उपहासात्मक टोलाही मुश्रीफ यांनी लगावला. 

आमदार चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल मुश्रीफ यांनी आजरा येथे झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. 

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, बहुजनांचे नेतृत्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडविला आहे. दहा ते बारा लोकसभेच्या व दहा ते बारा विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या आहेत. देशाचे कृषी मंत्री, संरक्षण मंत्री या पदांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्‍चितच मोठे आहे. राज्यात आणि केंद्रातही विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केले. तसेच, ते एकदाही पराभूत झालेले नाहीत.

चंद्रकांत पाटील यांनी काहीही न करता त्यांना एकदा नव्हे दोनदा मोठी संधी मिळाली होती. मात्र, या सगळ्याचा राज्याला तर सोडाच कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काहीही फायदा झाला नाही. 

या वेळी उमेश आपटे, जयवंतराव शिंपी, वसंतराव धुरे, दिलीप लाड, मुकुंद देसाई, तानाजीराव देसाई, संभाजी तांबेकर,अल्बर्ट डिसोझा उपस्थित होते. 

फडणवीस आघाडीत मतभेद निर्माण करीत आहेत : देसाई 

देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असल्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही. त्यामुळेच ते आघाडीमध्ये मतभेद निर्माण करण्याचे वक्तव्य करत आहेत, असा टोला राज्याचे गृहराज्यमंत्री शूंभराज देसाई यांनी लगावला. 

"विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शंभूराज देसाई हे कोल्हापुरात आले होते. त्या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

देसाई म्हणाले, "विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीकरिता कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षाची प्रचार यंत्रणा कार्यरत आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर आमचा भर आहे. तीनही पक्षांत चांगला समन्वय असून, शिवसेना दिलेली जबाबदारी निष्ठापूर्वक पार पाडेल. उमेदवारांच्या विजयात शिवसेनेचा मोठा वाटा असेल.

कोरोनाच्या संचारबंदीत उद्योग-व्यवसाय बंद राहिले. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत म्हणावे तसे उत्पन्न जमा झाले नाही. आर्थिक स्थिती जशी पूर्वपदावर येत राहील, तसा समतोल राखून सर्व विभागांना न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे. ज्या विभागांची निकड आहे, त्यांना सध्या निधी दिला जात आहे. तसा निर्णय मंत्रिमंडळ घेत आहे. ऊर्जा खाते तोट्यात चालले आहे. या खात्याचाही सहानुभूतीपूर्वक विचार करत आहोत.' 

"जिल्ह्यातील स्थिती पाहून व पालकांची संमती घेऊन स्थानिक प्रशासनाला शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात आहे,' असे शंभूराज देसाई म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख