तुमचा अतिसंस्कृतपणा महाराष्ट्राला ७० वर्षांपासून लूटतोय - Gopichand Padalkar's reply to Balasaheb Thorat's daughter Sharu Deshmukh's criticism | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

तुमचा अतिसंस्कृतपणा महाराष्ट्राला ७० वर्षांपासून लूटतोय

विश्वभूषण लिमये
बुधवार, 30 जून 2021

सुसंस्कृतपणा काय असतो, हे मला शिकवू नका.

सोलापूर : ‘‘महाराष्ट्रात दीडशे घराणी प्रचंड सुसंस्कृत आहेत. त्यांचा हा अतिसंस्कृतपणा महाराष्ट्राला मागील ७० वर्षांपासून लुटतोय. यांचे आजोबा, वडिल सगळे सुसंस्कृत आणि आम्ही मात्र असंस्कृत. आम्ही काही बोलायलो गेलो तर तो सुसंस्कृतपणा नाही. मी शिक्षकाचा मुलगा आहे, त्यामुळे सुसंस्कृतपणा काय असतो, हे मला शिकवू नका. काय बोलावं आणि काय बोलू नये, हे मला कळतं. मला जे तुमचं उघडं पाडायचं आहे, ते मी करतच राहणार,’’ अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांना भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिले. (Gopichand Padalkar's reply to Balasaheb Thorat's daughter Sharu Deshmukh's criticism)

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांनी ट्विटरवरुन गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला होता. ‘‘पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरुन आपल्या संस्काराची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार’’ असे म्हणत शरयू देशमुख यांनी पडळकर यांना टोला लगावला होता. त्यानंतर सोलापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत पडळकर यांनी देशमुखांच्या टीकेला उत्तर दिले.

हेही वाचा : वाझे प्रकरणात अजितदादांना अडकवण्यासाठी भाजपने टाकले फासे!

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीसंदर्भात राज्य सरकारला डाटा सादर करण्यास सांगितले होते. मात्र, राज्य सरकारने ते केले नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डीएनए बहुजनविरोधी आहे.म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने ओबीसीविरोधी याचिका दाखल केली आहे. त्याचबरोबर मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो, असेही पडळकर या वेळी म्हणाले.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून समाजासमाजामध्ये तेढ वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. मूठभर लोक बहुजनांचा आवाज दाबत आहेत. ओबीसींना दिलेले संविधानिक अधिकार हिसकावून घेण्याचे प्रयत्न करत आहेत. ओबीसींमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही पडळकर यांनी केला.

काय म्हणाल्या होत्या शरयू देशमुख

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर ओबीसी आरक्षण परत मिळवू देऊ शकलो नाही, तर राजकीय संन्यास घेऊ अशी घोषणा फडणवीस यांनी केल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही, अशी घोषणा केल्याची आठवण त्यांना करुन दिली. यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली होती. त्या टीकेला थोरात यांच्या लेकीने उत्तर दिले आहे. 

या संदर्भात थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांनी ट्वीट केले. त्या म्हणाल्या की ‘‘पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असे होते. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते. असो, ज्याचे त्याचे संस्कार..! ’’ असा टोला त्यांनी पडळकरांना लगावला आहे. 
 
बाळासाहेब थोरात काय म्हणाले होते 

''देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडवू. आता ओबीसी आरक्षण मिळवून दिले नाही, तर संन्यास घेईन म्हणतात. मात्र, यापैकी काहीही झालेले नाही,'' असा टोला थोरात यांनी फडणवीस यांना लगावला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख