राष्ट्रवादीला भरोसा वाटेना; सोलापूर नाशिकसह चार जिल्हा बॅंकांची निवडणूक पुढे ढकलली

राष्ट्रवादीतील या दोन मतप्रवाहामुळे जिल्हा बॅंकेची निवडणूक काही काळासाठी पुढे गेली आहे.
Election of Solapur District Co-operative Bank postponed
Election of Solapur District Co-operative Bank postponed

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने वेळापत्रकही जाहीर केले होते. येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बॅंकेची निवडणूक होईल, अशीही दाट शक्‍यता होती. आज मात्र सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने आदेश काढून सोलापूरसह, नाशिक, नागपूर आणि बुलडाणा या चार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर आहेत, त्या टप्प्यावर 31 मार्च 2022 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. (Election of Solapur District Co-operative Bank postponed)

एक विशेष बाब म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक घ्या, असे म्हणणारा एक गट राष्ट्रवादीत आहे तर आत्ताच निवडणूक नको, निवडणूक झाली तरीही आपल्या हातात बॅंक येणार नाही, असा सांगणारा दुसरा गट होता. राष्ट्रवादीतील या दोन मतप्रवाहामुळे जिल्हा बॅंकेची निवडणूक काही काळासाठी पुढे गेली आहे. 

सन 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेना व भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर आता राष्ट्रवादीचे किती संचालक निवडून येऊ शकतात?, आणि ज्या संचालकांच्या काळात बॅंकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली, तेच संचालक पुन्हा येऊ शकतात, अशीही शक्‍यता निर्माण झाल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. 

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर भारतीय रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या निर्देशानुसार प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बॅंकेला मार्च 2021 अखेर 162 कोटी रुपयांचा संचित तोटा झाला आहे. बॅंकेची शेती व बिगर शेती कर्जाची थकबाकी वसुली करूनच संचित तोटा कमी होणार असल्याने सद्यस्थितीत शेती कर्जाच्या वसुलीस अडचणी येत आहेत. संचित तोटा भरून काढण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्याबरोबरच सी.आर.ए.आर ची पूर्तता करण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

बॅंकेच्या थकबाकीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावशाली उपाययोजना करण्यासाठी आणि बॅंक आर्थिक स्थितीत येण्यासाठी बॅंकेवर नियुक्त केलेले प्रशासक आणखी काही कालावधीसाठी कार्यरत असणे आवश्‍यक असल्याचेही मत सहकार विभागाने नोंदविले आहे. जिल्हा बॅंकेची निवडणूक होणार असल्याने अनेक नेत्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. सहकार विभागाने आज काढलेल्या आदेशामुळे किमान काही महिने तरी आता बॅंकेच्या निवडणुकीचा विषय आता थांबला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com