मंगळवेढ्यातील धनगर समाजाने दिली भगिरथ भालकेंना खंबीर साथ  - The Dhangar community of Mangalwedha gave strong support to Bhagirath Bhalke in the by-election | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

मंगळवेढ्यातील धनगर समाजाने दिली भगिरथ भालकेंना खंबीर साथ 

हुकूम मुलाणी
मंगळवार, 4 मे 2021

आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक असलेल्या नंदेश्वर व मेटकरवाडी येथेही भाजपला मताधिक्य मिळाले नाही.

मंगळवेढा (जि. सोलापूर)  ः  मंगळवेढा तालुक्यातील बहुतांश गावांत धनगर समाजाचे बऱ्यापैकी प्राबल्य आहे. नुकत्याच झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनगर समाज आणि राष्ट्रवादी यांच्यात सोशल मीडियातून बऱ्याच वेळा टीका टिप्पणी ऐकावयास मिळत होती. त्याही परिस्थितीत मंगळवेढ्यातील धनगर समाज राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याचे निवडणूक निकालाच्या आकडेवारीवरून दिसून येते. (The Dhangar community of Mangalwedha gave strong support to Bhagirath Bhalke in the by-election)

नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीसाठी धनगर समाजाचे मतदान आपल्या पदरात पडावे, यासाठी भारतीय जनता पक्षाकडून आमदार गोपीचंद पडळकर यांचा प्रभावी वापर करण्यात आला. राष्ट्रवादीकडून पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून तालुक्यातील धनगर समाजाची मते मिळवण्याचा प्रयत्न पक्षीय पातळीवर करण्यात आला. 

मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण व पूर्व भागात धनगर समाजाचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे. निकालानंतर समोर आलेली आकडेवारी पाहता आवताडे गटात माजी सभापती प्रदीप खांडेकर यांचे नेतृत्व, तर राष्ट्रवादीमध्ये मुढवी येथील तानाजी खरात, सुरेश कोळेकर यांच्या नेतृत्वाचा दबदबा तालुक्याच्या राजकारणात दिसून आला. त्यामध्ये पडोकरवाडी, लोणार, ममदाबाद हु., रेवेवाडी, हुन्नूर, शिरनांदगी,मारोळी, चिक्कलगी, रड्डे ,भोसे, जालीहाळ, निंबोणी, हुलजंती, हजापूर, मेटकरवाडी, जुनोनी, खुपसंगी, गोणेवाडी, खोमनाळ, अरळी, येड्राव, खवे, सिद्धापूर, तांडोर, बठाण, उचेठाण, मुढवी, तळसंगी, मरवडे  या गावातील धनगर समाजाने भगिरथ भालके यांना खंबीर साथ दिली आहे. 

भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या पाठीशी मंगळवेढा शहर,मानेवाडी, लवंगी, सलगर खुर्द, शिवनगी, येळगी,बावची,जित्ती,पाठखळ, मुंढेवाडी डोंगरगाव,हिवरगाव या गावातील मतदार राहिल्याचे दिसून आले. यातील काही गावाततील ग्रामपंचायतीवर गेल्या काही वर्षापासून आवताडे गटाचे वर्चस्व आहे. त्यामध्ये माजी सभापती प्रदीप खांडेकर यांच्या हिवरगावात चांगले मताधिक्‍य आवताडे यांना मिळाले. सलगर खुर्द येथे विठ्ठल सरगर, विजय माने (कात्राळ), अमोल माने (येड्राव) यांच्या मदतीने मताधिक्‍य घेणे शक्य झाले.
         
दुसरीकडे, भगीरथ भालके यांना तानाजी खरात (मुढवी) रामचंद्र मळगे (तांडोर), जगन्नाथ रेवे (रेवेवाडी) सुरेश कोळेकर (रड्डे), रामेश्वर मासाळ (गोणेवाडी ), ज्ञानेश्वर खांडेकर (निंबोणी), गुलाब थोरबोले (शिरनांदगी), धनाजी बिचुकले (हाजापूर), मच्छिंद्र खताळ (हुन्नुर), ईश्वर गडदे, दादासाहेब दोलतडे, दादा गरंडे, दौलत माने, संग्राम दुधाळ, कामानंद हेगडे, हणमंतराव दुधाळ, महादेव मासाळ, मधुकर गंगमई, भारत मासाळ अशा विविध गावांतील  अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गावातून राष्ट्रवादीच्या मागे ताकद उभी केली. या निवडणुकीत धनगर समाज भक्कमपणे राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहिल्याचे दिसले. 

आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक असलेल्या नंदेश्वर व मेटकरवाडी येथेही भाजपला मताधिक्य मिळाले नाही. परंतु पक्षीय पातळीवर मतदान मिळवण्यासाठी त्यांचा प्रभावीपणे वापर मात्र निवडणुकीच्या निमित्ताने करण्यात आला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख