पालकमंत्री भरणेंविरोधातील रोष कमी करण्यासाठी अजितदादा, जयंतराव उतरले मैदानात - Deputy Chief Minister Ajit Pawar held a meeting at the Ministry regarding the water issue of Solapur city | Politics Marathi News - Sarkarnama

पालकमंत्री भरणेंविरोधातील रोष कमी करण्यासाठी अजितदादा, जयंतराव उतरले मैदानात

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 11 मे 2021

आज तातडीने पाणीबाबतची बैठक लावून भरणे यांनी त्यांच्या विरोधात वाढत जाणारा आवाज कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई : उजनी धरणातून (Ujani dam) इंदापूरसाठी (Indapur) पाच टीएमसी पाणी उचलणे, कोरोनाकाळात पालकमंत्री दत्तात्रेय भरणे (Guardian Minister Dattatreya bharane) यांचे झालेले दुर्लक्ष यामुळे सोलापूर (Solapur) जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात (Nationalist Congress) विशेषतः पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या विरोधात तीव्र संतापाची भावना आहे. तो रोष कमी करण्याच्या हेतूने पालकमंत्री भरणे यांनी सोलापूर शहराच्या पाणीप्रश्न मार्गी लावण्याचा विषय हाती घेतला आहे. त्यास उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही तातडीने प्रतिसाद देत आज मंत्रालयात पवारांनी जलसंपदा मंत्री आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासोबत बैठक घेतली. एकंदरीतच उजनी प्रश्नावरून सोलापूर जिल्ह्यातून व्यक्त होणारा रोष कमी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहराच्या पाणीप्रश्नाच्या माध्यमातून पाऊले टाकली जात आहेत. (Deputy Chief Minister Ajit Pawar held a meeting at the Ministry regarding the water issue of Solapur city)

दरम्यान, सोलापूर शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू राहण्यासाठी जलसंपदा विभागाकडून आवश्यक असणारी ‘ना हरकत प्रमाणपत्रे’ तातडीने देण्यात यावीत. तसेच, महापालिकेकडील जलसंपदा विभागाच्या थकीत वसुलीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करावी, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. ११ मे) मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

हेही वाचा : आमदार राऊतांनी उपोषणाचा इशारा देताच सोलापूरला मिळाली १८९० रेमडेसिव्हिर इंजेक्शन 

उजनीचे पाण्यावरून पेटलेला वाद शमविण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री आणि इंदापूरचे लोकप्रतिनिधी दत्तात्रेय भरणे यांनी सोमवारी पुण्यात इंदापूर आणि सोलापूरच्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. त्या वेळीही गदरोळ झाला होता. भरणे आणि अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली. पालकमंत्री खोटे बोलत असून यापुढील आंदोलन गोविंदबागेत करण्याचा इशारा उजनी धरण पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खोपसे यांनी दिला होता.

या बैठकीनंतर बोलताना भरणे यांनी सोलापूरचे पाणी कमी होणार नाही. मात्र, इंदापूरला पाणी मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. तसेच सोलापूर शहराची पाणी योजना दहा वर्षांपासून अपूर्ण आहे. ती मीच पूर्ण करणार आहे. येत्या दहा महिन्यांत सोलापूरपा पाणीप्रश्न सोडवू, असे आश्वासनही त्यांनी काल दिले होते. त्यानंतर आज तातडीने पाणीबाबतची बैठक लावून भरणे यांनी त्यांच्या विरोधात वाढत जाणारा आवाज कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

तत्पूर्वी सोलापूरच्या पालकमंत्रीपदावरून भरणे यांना हटविण्यात यावे, अशी मागणी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेस पक्षाकडून झाला होता. भरणे यांच्याऐवजी प्रणिती  शिंदे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांच्याकडे पालकमंत्रीपद सोपवावे, अशी मागणीही करण्यात आली होती. त्यामुळे उजनीचे पाणी, पालकमंत्र्यांचे कोरोनाकाळात झालेले दुर्लक्ष यामुळे भरणे आणि राष्ट्रवादीच्या विरोधातील रोषाची भावना कमी करण्याचा प्रयत्न खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार आणि  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून झाला आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख