मतदानाच्या दिवशी आवताडेंची 'व्यवस्था' सहानुभूतीला वरचढ ठरणार काय? - Counting of votes in Pandharpur will be held on May 2, | Politics Marathi News - Sarkarnama

मतदानाच्या दिवशी आवताडेंची 'व्यवस्था' सहानुभूतीला वरचढ ठरणार काय?

भारत नागणे  
रविवार, 18 एप्रिल 2021

मतदार संघातील दुष्काळी 35 गावातील पाणी प्रश्न दोन्ही पक्षाकडून पुढे करण्यात आला.

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी शनिवारी (ता.17) संपली. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत 66.15 टक्के इतके मतदान झाले. मतदार संघात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीत काटे की टक्कर अशीच एकूण लढत झाली. या लढती मध्ये कोण बाजी मारणार हे येत्या दोन मे रोजीच्या निकालानंतरच समजणार असले तरी दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्यांकडून विजयाचा दावा केला जात आहे.

पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर शनिवारी (ता.17) मतदान झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिवगंत आमदार भारत भालकेंचे पुत्र भगिरथ भालकेंना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. तर त्यांच्या विरोधात भाजपने मंगळवेढा येथील उद्योगपती समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली. भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी समाधान आवताडेंना पाठिंबा दिला. परिचारकांच्या पाठिंब्याच्या बळावरच भाजपने निवडणुक जिंकण्याच्या दृष्टीने मतदार संघात फिल्डिंग लावली होती.

फडणवीस, दरेकर, लाड, अळवणी हे रात्री पोलिस ठाण्यात का गेले?

पंधरा दिवसाच्या प्रचाराच्या धुराळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला. दोघांनीही अनेक जाहीर सभा घेतल्या. गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या बैठका, गाठीभेटी घेवून त्यांना कामाला लावण्याचा कसोशीने प्रयत्न केला. तर दुसरीकडे भाजपचे अनेक आमदार आणि नेतेमंडळी मतदार संघात ठाण मांडून होती. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील जातीने लक्ष घालून कार्यकर्त्यांना कामाला लावले. भाजपचे पक्ष निरीक्षक बाळा भेगडे, निवडणूक प्रमुख खासदार रणजितसिंह निंबाळकर, जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर पक्षाने निवडणुकीची जबाबदारी दिली होती. तिघांनाही ही जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडली.

मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजपचे पदाधिकारी मतदारांना मतदानासाठी बाहेर काढत असतानाचे चित्र दिसून आले. तर राष्ट्रवादीच्या गोटात  याउलट चित्र पाहायला मिळाले. निवडणुक प्रचारात राष्ट्रवादीने विकासाच्या मुद्द्यांबरोबरच भावनिकेताचा मुद्दाही प्रकर्षाने मांडला. भाजपने राष्ट्रवादी सरकारच्या दीड वर्षाच्या कारभारा विरोधात जोरदार प्रचार केला. लाॅकडाऊन काळातील सक्तीची थकीत वीज बिल वसुली, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना न मिळालेली नुकसान भरपाई ऐन उन्हाळ्यात थकबाकीसाठी शेतकर्यांची कापलेली वीज हे सरकार विरोधी मुद्दे भाजप नेत्यांनी सभांमधून आक्रमकपणे मांडले. याच दरम्यान राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केल्याने राष्ट्रवादीवर व्यापारी वर्ग नाराज असल्याचेही दिसून आले.

मतदार संघातील दुष्काळी 35 गावातील पाणी प्रश्न दोन्ही पक्षाकडून पुढे करण्यात आला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुन्हा पाणी देण्याचे आश्वासन दिले तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट केंद्र सरकारकडून निधी आणून ही योजना येत्या तीन वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या या आश्वासानामुळे मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागात भाजपला चांगला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरीही दुष्काळी भागातील मतदार कोणाच्या बाजूने कौल देतो यावरही निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. मंगळवेढा शहरात भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचे संघटन कौशल्य चांगले आहे. त्याचा फायदा आवताडे यांना होण्याची शक्यता आहे. शिवाय मंगळवेढ्याचा भूमिपूत्राचा मुद्दीही या  निवडणुकीत खूप चर्चेचा विषया झाला. 

पंढरपूर-मंगळवेढ्याचे मतदान झाले अन् भेगडे कोरोना पाॅझिटिव्ह
 

विरोधी पक्ष नेते देंवेंद्र फडणवीस यांनी दिलेले उपसिंचन योजनेचे आश्वासन आणि भूमिपूत्र हे दोन मुद्दे प्रभावी ठरले तर मंगळवेढ्यातून समाधान आवताडे यांना विजयाचा मार्ग सुखर होईल असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. अपक्ष उमेदवार सिध्देश्वर आवताडे हे किती मजल मारतात यावरही समाधान आवाताडे यांच्या विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.

पंढरपूर शहर आणि तालुक्यातील 22 गावात भाजप आमदार प्रशांत परिचारकांची राजकीय ताकद मोठी आहे. तर दिवंगत आमदार भारत भालकेंना माननारा वर्ग ही मोठा आहे. आमदार भारत भालकेंच्या निधनानंतर पोट निवडणुक होत असल्याने शहरा बरोबरच ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालकेंना सहानभूती मिळण्याची शक्यता आहे.

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर व तालुक्यातील 22 गावांनी सुमारे 6 हजाराचे मताधिक्य दिल्याने भालकेंचा विजय सोपा झाला होता. परंतु या निवडणुकीत मागील दीड वर्षापूर्वीची भालकेंच्या बाजूने असलेली राजकीय स्थिती काहीसी कमजोर झाल्याचे दिसून आले. त्यामुळे भालकेंना ग्रामीण भागातून मते घेताना खडतर प्रवास करावा लागणार आहे.

पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून मतदानाच्या एक दिवस आधी पंढरपूर शहरात भगिरथ भालकेंच्या बाजूने चांगले वातावरण होते. परंतु ऐन मतदानाच्या दिवशी भालकेंची शहरातील प्रचार यंत्रणा काहीशी तोकडी पडल्याचे दिसून आले. तर भाजप आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक यांच्या नेतृत्वाखाली परिचारक गटाच्या सर्व नगरसेवक आणि पदाधिकार्यांनी शेवट पर्यंत यंत्रणा नेटाने आणि प्रभावीपणे कार्यरत ठेवली. त्याचाही फायदा यावेळी भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना होईल असा अंदाज आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील, अपक्ष उमेदवार शैला गोडसे हे किती आणि कोणाचे मते घेतात यावरही भालके-आवताडे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे. निवडणुकीमध्ये दोन्ही उमेदवारांकडून साम, दाम यांचा पुरेपूर वापर करण्यात आला. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी विजयाचा दावा केला आहे. पंढरपुरात राष्ट्रवादी आपली जागा कायम राखणार की भाजपचे कमळ फुलणार हे 2 मे रोजीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. तरीही आतापासूनच मतदार संघात विविध अंगाने निकालाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
 Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख