वार्ड रचना रद्द करून ग्रामपंचायत सदस्य जनतेतून निवडा  - Cancel the ward structure and elect Gram Panchayat members from the people | Politics Marathi News - Sarkarnama

वार्ड रचना रद्द करून ग्रामपंचायत सदस्य जनतेतून निवडा 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 24 जानेवारी 2021

वार्ड पध्दत रद्द करुन सदस्यांची निवड जनतेतून व्हावी. तसा राज्य शासनाने कायदा करावा, अशी मागणी आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केली. 

पंढरपूर : ग्रामपंचायतीच्या सरपंचाची जनतेतून निवड करणे ही पध्दत चांगली होती. त्यानंतर आता सदस्यांमधून सरपंचाची निवड केली जाणार आहे. हीपण पध्दत चांगली आहे. पण, यापुढे जावून आता वार्ड पध्दत रद्द करुन सदस्यांची निवड जनतेतून व्हावी. तसा राज्य शासनाने कायदा करावा, अशी मागणी आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केली. 

पंढरपूर तालुक्यातील नवनिर्वाचित सदस्यांसाठी डीव्हीपी उद्योग समूहाच्या वतीने इसबावी येथील श्रीराम मंगल कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यावेळी कार्यशाळेत ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन करताना पेरे पाटील यांनी आदर्श गावाची संकल्पना मांडली. 

जनतेतून सरपंच निवड ही पध्दत योग्य होती, असं मत व्यक्त करत सरपंचपदाचा घोडे बाजार थांबवण्यासाठी  निवडणुकीनंतर आरक्षण सोडत जाहीर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागतही त्यांनी केले.

बिनविरोध निवडणुका झाल्या तर चांगलीच गोष्ट आहे. निवडणुका झाल्याच तर त्या निकोप  लोकशाही पध्दतीने व्हायल्या पाहिजेत. धाक दडपशाही आणि पैशाच्या जोरावर निवडणुका होत असतील तर ते समाजासाठी घातक असल्याची खंतही पाटील यांनी व्यक्त केली.

नवीन निवडून आलेल्या सदस्यांनी आपल्या गावचा आणि भागाचा विकास करण्याची शपथ घेतली पाहिजे. ज्या विश्वासाने लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे. त्यांचा विश्वास सार्थ करुन दाखवणे तुमचे काम आहे. ग्रामपंचाय सदस्य हे शोभेचे किंवा स्वतःला मिरवण्यासाठी पद नाही. तर, गावच्या सर्वागिण विकासाला चालण्यासाठी देण्यासाठी आहे, असही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यशाळेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डीव्हीपी उद्योग समुहाचे प्रमुख अभिजीत पाटील, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख