राणेंचा शिवसेनेला धोबीपछाड; झेडपी अध्यक्षपदी भाजपच्या संजना सावंत 

राणे यांच्या नेतृत्वाखाली गेली पंचवीस वर्षे जिल्हा परिषद अध्यक्ष विराजमान होत आहे.
BJP's Sanjana Sawant elected as Sindhudurg Zilla Parishad president
BJP's Sanjana Sawant elected as Sindhudurg Zilla Parishad president

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातील सत्ता मिळविण्याचे शिवसेनेचे प्रयत्न हाणून पाडत खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेला धोबीपछाड दिला आहे. भाजपच्या संजना सावंत यांनी शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांच्यावर 30 विरोध 19 मतांनी विजय मिळविला. विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार नीतेश राणे यांच्यासह आनंदोत्सव साजरा केला. तसेच, शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी बुधवारी (ता. 24 मार्च) मतदान झाले. त्यात भाजपकडून संजना सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर शिवसेनेकडून वर्षा कुडाळकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले होते. शिवसेनेकडून जिल्हा परिषदेतील भाजपची विशेषतः राणे कुटुंबीयांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. प्रत्यक्ष मतदानात ते रुपांतरित झालेच नाहीत. राणे गटाने उमेदवारी जाहीर केलेल्या संजना सावंतांनी शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांचा पराभव करत सत्ता कायम राखली. 

नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने शिवसेनेचा पराभव करत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा झेंडा फडकवला आहे. राणे यांच्या नेतृत्वाखाली गेली पंचवीस वर्षे जिल्हा परिषद अध्यक्ष विराजमान होत आहे. जेव्हा, जेव्हा निवडणूक होईल, तेव्हा भाजपचाच अध्यक्ष होईल, असा विश्‍वास आमदार नीतेश राणे यांनी निवडीनंतर व्यक्त केला. ते म्हणाले, ""कोणतेही दोन विचार जनतेच्या मनात आणि सदस्यांच्या मनांत नाहीत. आमचे 31 जिल्हा परिषद सदस्य राणे यांच्या विचाराने आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारावर विश्‍वास ठेवून काम करणारे निष्ठावंत आहेत.'' 

झेडपीला आले छावणीचे रूप 

अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे जिल्हा परिषदेत कडक पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या मुख्य दरवाजा वगळता अन्य सर्व दरवाजे दुपारी एकपासून बंद ठेवण्यात आले होते. यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसह अभ्यंगताना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. 

बंदोबस्त वाढविल्याने वातावरण तणावग्रस्त 

जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीसाठी यापूर्वी केव्हाही एवढा कडक पोलिस बंदोबस्त नव्हता, असा बंदोबस्त आजच्या निवडीच्या वेळी ठेवण्यात आला होता. यामुळे सकाळपासून शांत असलेले जिल्हा परिषदेतील वातावरण अचानक पोलिस बंदोबस्त वाढवल्याने अधिक तणावग्रस्त बनल्याचे दिसत होते. 

ओळखपत्र नसलेल्या कर्मचाऱ्यांनाही बाहेर थांबावे लागले 

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात निवडणूक प्रक्रियेवेळी जिल्हा परिषद सदस्य वगळता कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. शिवाय आवारातही अन्य कुणालाही प्रवेशास संमती नव्हती, त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्यांना दुपारी एकपासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रवेश दिला नाही. त्यांना प्रवेशद्वाराबाहेरच ताटकळत राहावे लागले. ओळखपत्र तपासूनच पोलिसांकडून प्रवेश दिला जात असल्याने ओळखपत्र सोबत नसलेल्या कर्मचाऱ्यांनाही बाहेर थांबावे लागले. 

सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतीय जनता पक्ष आणि खासदार नारायण राणे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. आम्हाला आव्हान देणारा आणि धक्का देणाऱ्यांना दहा जन्म घ्यावे लागतील. तरीपण तो समोर उभा राहणार नाही. शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची आज काय राज्यात अवस्था आहे. कोण त्या बुडत्या जहाजामध्ये जाऊन बसणार? ते मोजकेच दिवस सत्तेमध्ये असणार आहेत. 

- नीतेश राणे, आमदार भाजप 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com