भाजप-राष्ट्रवादी पहाटेच्या शपथविधीसाठी पुन्हा एकत्र येणार आहेत  ः राजू शेट्टींचा खळबळजनक दावा - BJP-NCP will meet again for the swearing in ceremony in the morning : Raju Shetty's sensational claim | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप-राष्ट्रवादी पहाटेच्या शपथविधीसाठी पुन्हा एकत्र येणार आहेत  ः राजू शेट्टींचा खळबळजनक दावा

भारत नागणे
गुरुवार, 15 एप्रिल 2021

या लबाड सरकारला जागा दाखवून देण्याची ही वेळ आली आहे.

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी भारतीय जनता पक्षाची ही नुरा कुस्ती आहे. पहाटेच्या शपथविधीसाठी पुन्हा ते दोन्ही पक्ष  एकत्र येणार आहेत, असा खळबळजनक आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे जाहीर सभेत केला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेश प्रवक्ते रणजीत बागल, जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, उमेदवार सचिन पाटील, शहाजान शेख, विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक धनंजय पाटील, राजाराम सावंत, विश्रांती भुसनर, विजय रणदिवे, अॅड.राहुल घुले आदी उपस्थित होते.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, कोरोनाच्या नावाखाली महाविकास आघाडी सरकारने मोठा भ्रष्टाचार केला आहे. लोकांच्या खिशाला कात्री लावून वसुली सुरू केली आहे. लाॅकडाऊन काळातील थकीत वीजबिल माफ करतो असं आश्वासनं दिलं होतं. पण सरकारने ते पाळलं नाही. अशा लबाड सरकारला जागा दाखवून देण्याची ही वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या शेती मालाला भाव मिळत नाही. अनेकांचा रोजगार बंद झाला आहे. बारा बलुतेदार मोठ्या संकटात आहेत. राज्य अडचणीत असतानाही मंत्र्यांच्या घरावर सरकार  कोट्यवधी रूपयांचा खर्च करत आहे. त्यामुळे सरकारकडे नैतिकताचा शिल्लक राहिली नाही.

दोन्ही उमेदवारांच्या साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 86 कोटींची एफआरपीची थकली आहे. यावर कोणीच बोलत नाही. विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून एकमेकावर टिकाटिप्पणीचा प्रचार सुरू आहे. भाजप आणि राष्ट्रवादी हे नावापुरते एकमेकांच्या विरोधात आहे. त्यांची ही नुरा कुस्ती आहे. आम्ही त्यांचा हा डाव ओळखूनच स्वाभिमानी  निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मतदार संघात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखे गल्लीबोळात फिरत आहेत. त्यांना या उमेदवाराचे काहीच देणंघेणं नाही. त्यांचा डोळा फक्त विठ्ठल साखर कारखान्यावर आहे, असा आरोपही शेट्टी यांनी केला.

ही लढाई परिवर्तनाची आहे. पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील जनतेला ही संधी मिळाली आहे. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा निकाल असल्याने मतदारांनी जागरुकतेने मतदान करावे, असे आवाहन स्वाभिमानीचे प्रदेशध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केलं. या वेळी सचिन पाटील, श्रीमंत कोकाटे यांचीही भाषणे झाली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख