हवे तर घरात बसा पण शेतकऱ्यांना मदत द्या : प्रवीण दरेकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला

प्रवीण दरेकर यांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भागाचा दौरा केला. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला. माजी मंत्री सदाभाऊ खोत यावेळी त्यांच्याबरोबर होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली
Pravin Darekar - Uddhav Thackeray
Pravin Darekar - Uddhav Thackeray

सांगली :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रेड कार्पेटवर उभारून पाहणी दौरा करत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चिखलात जाऊन थेट शेतकऱ्यांची संवाद साधत आहोत.  मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यातून काही साध्य होणार नसेल तर त्यांनी घरातच बसावं मात्र शेतकऱ्यांच्या साठी लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी येथे केली.

प्रवीण दरेकर यांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भागाचा दौरा केला. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला. माजी मंत्री सदाभाऊ खोत यावेळी त्यांच्याबरोबर होते. ''सांगली जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे अत्यंत विदारक चित्र झाले आहे. शेती उध्वस्त झाली आहे. विजेचे खांब, रस्ते उखडले गेले आहेत. ४ हजार ६०० हेक्टरच्या आसपासचे क्षेत्र बाधित झाले आहे. पाच ते सहा हजार शेतकरी नुकसानग्रस्त झाले आहेत. सहाशे सातशे म्हणजे फक्त दहा टक्के शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे झाले आहेत. शेतकऱ्यांना तातडीची मदत देणे आवश्यक आहे. पण दुर्दैवाने या सरकारच्या संवेदना गोठल्या आहेत. यंत्रणा गतीमान करायला हवी होती ती झालेली नाही,'' अशी टीका दरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली. 

दरेकर पुढे म्हणाले, "मी मराठवाडा, सोलापूरचा दौरा केला. तिथेही दहा टक्क्यांच्या वर पंचनामे झालेले नाहीत. त्यातही सरसकट पंचनामे होण्याची आवश्यकता आहे. फारसे सोपस्कार करु नयेत. नजर अंदाजाने जे पंचनामे केले आहेत, ते ग्राह्य धरावेत. शेतकऱ्यांना खायचे काय ही विवंचना आहे. आतातरी जागे व्हा. तात्काळ २५ हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावेत. हे तात्पुरते नुकसान नाही. शेती खरवडली गेलेली आहे. त्यावरही खर्च होणार आहे. २५ हजार रुपये कोरडवाहूला आणि पन्नास हजार रुपये व फळबागांना एक लाख रुपये बागायतीला देऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन म्हणाले होते. त्या वचनाची त्यांनी पूर्तता त्यांनी करावी, एवढीच आमची मागणी आहे,"

''एकीकडे पीक कर्जे मिळत नाहीत. अजूनही कर्जमाफी झालेली नाही. प्रत्येकाने आपल्या शेतीवर कर्ज घेतले आहे. त्याच्या हप्त्यांसाठी तगादा लागला आहे. त्यांनी हप्ते कुठून भरायचे. या शेतकऱ्यांची पीक कर्जे माफ करावीत, अशीही आमची मागणी आहे. टोलवाटोलवी बास झाली. केंद्रावर ढकलणे बास झाले. शेतकरी दुधखुळा नाही. शेतकऱ्यांना समजते आहे काय चालले आहे ते. त्यामुळे आता ढकलाढकली नको. त्यामुळे दौरे नाही केलेत तरी चालेल. नाहीतरी दौऱ्यावर जाऊन कुठेतही पुलावर ग्रीन कार्पेट टाकून आपण उभे राहता. दुसरीकडे देवेंद्रजी आणि आम्ही मंडळी चिखल तुडवत फिरतो. कारण बांधावर गेल्याशिवाय त्यांची दुःखे समजणार नाहीत. त्यामुळे आमचे तुम्हाला सांगणे आहे की फिरला नाहीत तरी चालेल, पण शेतकऱ्यांना पैसे द्या,'' असा घणाघात त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, "पवार साहेब हे अनुभवी नेते आहेत. केंद्र कशी मदत करते हे पवार साहेबांना नीट माहिती आहे. परंतु आता राजकीय प्रत्येक गोष्ट राजकारणातून बघू नका, असे माझे त्यांना सांगणे आहे. तुम्ही सांगता की प्रक्रियेला दीड महिना लागेल आणि केंद्राला सांगायचे की तात्काळ मदत करा. मुख्यमंत्र्यांनी व पवार साहेबांनी अशी भूमीका घेऊ नये,'' कर्ज उभे करा असे पवार साहेबांनी सांगितले आहे. मग विचार कसला करता. बळीराजासाठी कर्ज  काढण्यास काय हरकत आहे, असाही सवाल दरेकर यांनी केला.

''धाडसी निर्णय तात्काळ घेण्याची आवश्यकता आहे. सरकार चालवायला दम असावा लागतो असे फडणवीस म्हणाले होते. त्याचा अर्थ तात्काळ निर्णय घेणे असा आहे. कोल्हापूर-सांगलीच्या महापुरात त्यांनी काय निर्णय घेतले हे आठवा. आम्ही तात्काळ पैसे दिले. तो जीआर तसाच्या तसा राबवला तरी शेतकरी खूष होतील. मायबाप सरकारला संवेदना असाव्या लागतात. पूल पडले आहेत. सरकारचे हे काम नव्हते का? हे कुणाचे काम आहे? लोकांना काय हवे याचे काहीही पडलेले नाही. अत्यंत बेफीकीरीने हे सरकार वागते आहे. या सरकारला जागे करण्यासाठी मी व फडणवीस दौरा करत आहोत,'' असेही दरेकर म्हणाले. 
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com