पंढरपूर : भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी शिरीष कटेकर यांना झालेल्या मारहाणप्रकरणी हलगर्जीपणा दाखवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची चौकशी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी (ता. 12 फेब्रुवारी) केली.
दरम्यान घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेताना उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रेय पाटील यांच्यावर किरीट सोमय्या व प्रवीण दरेकर यांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती करत चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे पाटील व त्यांचे सहकारी अधिकारी यांची बोलतीच बंद झाली.
भाजपचे माजी सोलापूर जिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांच्या तोंडाला काळे फासून शिवसैनिकांनी मारहाण केली होती. त्यानंतर राज्यस्तरावरील भाजप नेत्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. कटेकर यांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर तकलादू कलमे लावून करवाई केली, असा आरोप सोमय्या आणि दरेकर यांनी आज येथे केला. भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या संबंधित शिवसैनिकांवर कारवाई करावी; अन्यथा पोलिसांच्या विरोधात राज्यभरात आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर पोलिसांनी राज्य सरकारच्या दबावाखाली कठोर कारवाई केली नाही, असा आरोपही दरेकर यांनी केला. मारहाण करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई का केली नाही, असे अनेक प्रश्न पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दरेकर व सोमय्या यांनी उपस्थित केले.
जर पोलिस अशा पद्धतीने थातूरमातूर कारवाई करत असतील, तर कुठेतरी राज्य सरकारचा दबाव असल्या संशय आहे. काळे फासणे हा प्रकार दिसतो, तितका साधा नाही. यातून शिरीष कटेकर यांना जीवे मारण्याची धमकीही दिली जाते. मारहाणीत त्यांच्या डोळ्याला जखम झाली आहे, तरीही पोलिसांनी कठोर कारवाई केली नाही, याचा जाब भाजप नेत्यांनी विचारला.
येत्या दोन दिवसांत पोलिसांनी योग्य कलमे लावून कठोर कारवाई केली नाही तर पोलिस आणि राज्य सरकारच्या विरोधात राज्यस्तरीय आंदोलन केले जाईल, असा इशाराही भाजप नेत्यांनी दिला. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
भाजपचे पदाधिकारी शिरीष कटेकर यांनी अलीकडेच एका आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कटेकर यांना काळे फासून मारहाण केली होती. मारहाणीचा व तोंडाला काळे फासल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला होता, त्यामुळे भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

