Ashok Chavan had sent a special helicopter to take Bharat Bhalke to Mumbai
Ashok Chavan had sent a special helicopter to take Bharat Bhalke to Mumbai

भालकेंना मुंबईला नेण्यासाठी अशोक चव्हाणांनी खास हेलिकॉप्टर पाठवले होते 

जेव्हा विजयदादांची उमेदवारी पंढरपूरमधून जाहीर झाली, तेव्हा त्यांनी मागे न हटता पूर्ण ताकदीने लढा दिला.

पंढरपूर : शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या भारत भालके यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. कारखान्याचे संचालक ते पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार असा प्रवास त्यांनी अल्पावधीतच केला.

विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीत त्यांच्यासमोर विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासारखे मातब्बर नेते होते. विजयदादांच्या पाठीशी त्या वेळी जिल्हा, राज्यातील नेते असूनही भालके यांनी सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर विजय खेचून आणला. विजयदादांसाख्या दिग्गज नेत्याचा पराभव करून त्यांनी "जायंट किलर' काय असतो, हे उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिले. त्यांच्या सन्मानासाठीच कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भालकेंना मुंबईला नेण्यासाठी खास हेलिकॉप्टर पाठविले होते. 

पंढरपूर तालुक्‍यातील सरकोली येथे 1960 मध्ये शेतकरी कुटुंबात जन्म झालेले आमदार भारत भालके यांचे दहावीपर्यंचे शिक्षण द. ह. कवठेकर प्रशालेत झाले. त्यानंतर शिक्षणाबरोबरच पहिलवानकीसाठी ते कोल्हापूरला गेले. कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत पहिलवानकीचा सराव सुरु केला. तिथेच त्यांना राजकारण आणि समाजकारणाची आवड निर्माण झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. 

कोल्हापूरच्या तालमीतून आल्यानंतर त्यांनी राजकारण आणि समाजकारणाला सुरूवात केली. माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पंढरपूर तालुक्‍यात जनसेवा संघटनेचे काम सुरु केले. पुढे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद मिळवून देण्यात प्रतापसिंहांचा मोठा वाटा होता. 

पहिलवान असलेले भालके हे 1992 मध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये आले. संचालकाच्या रुपाने त्यांनी तालुक्‍याच्या राजकारणात प्रवेश केला. अवघ्या काही दिवसांतच त्यांनी औदुंबरअण्णा पाटील यांचा विश्वास संपादन केला. त्याच विश्वासावर त्यांना विठ्ठल कारखान्याचे उपाध्यक्षपदही मिळाले. 

दरम्यानच्या काळात वसंतराव काळे आणि औदुंबरअण्णा पाटील यांच्यात राजकीय दुही निर्माण झाली होती. यामध्ये भालकेंनी काळे यांचे नेतृत्व मान्य करत कामाला सुरुवात केली. काळे यांच्या निधनानंतर आमदार भारत भालके यांनी 2002 मध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले. तेथूनच त्यांनी आमदार होण्याचे स्वप्न पाहिले. जो विठ्ठल कारखान्याचा अध्यक्ष, तो तालुक्‍याचा आमदार अशी म्हणच त्यावेळी तालुक्‍यात रूढ झाली. 

भालकेंनी 2004 मध्ये प्रथमच विठ्ठल परिवाराच्या झेंड्याखाली विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारून पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. पुढच्या निवडणुकीत तर त्यांच्यापुढे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे होते. मी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून तयारी करत आहे, हे बाब त्यांनी विजयदादांच्या कानावर घेतली होती. त्यांनीही भालकेंना तयारी करा, असे सांगितले होते. त्यामुळेच जेव्हा विजयदादांची उमेदवारी पंढरपूरमधून जाहीर झाली, तेव्हा त्यांनी मागे न हटता पूर्ण ताकदीने लढा दिला. 

राज्य, तसेच जिल्ह्यातील सर्व नेते विरोधात असूनही पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी विजयदादांचा पराभव केला आणि "जायंट किलर'चा खराखुरा अर्थ दाखवून दिला. विजयदादांसारख्या मोठ्या नेत्याला हरवून त्यांनी तालमीबरोबर आपण राजकारणातील पहिलवान असल्याचे दाखवून दिले होते. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com