Akola NCP Officer Bearers Unhappy about Amol Mitkari's Candidature | Sarkarnama

अमोल मिटकरी यांच्या नियुक्तीने अकोला जिल्हा राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस

मनोज भिवगडे 
शुक्रवार, 15 मे 2020

अमोल मिटकरी हे अकोला जिल्ह्यातील मास लिडर नसल्याने अजितदादांनी केलेल्या नियुक्तीनंतरही त्यांचे अकोला जिल्ह्यात मनमोकळेपणाने कुणी स्वागत करू शकले नाही. मिटकरी यांच्या गटाचे ठरवून आपल्याला जिल्ह्यातील इतर नेत्यांकडून त्रास तर होणार नाही ना, अशी भावना असल्याने मिटकरीच्या स्वागताबाबत बहुतांश कार्यकर्ते व नेत्यांनी धाडस केलेले दिसत नाही

अकोला  : अमोल मिटकरी यांना विधान परिषदेची उमेदवारी देणे अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांना रूचले नाही. मात्र  थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटातून ही नियुक्ती असल्याने मिटकरी यांची नियुक्ती या नेत्यांसाठी तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करण्यासारखे झाले आहे.

सार्वजनिकरित्या कुठेही विरोध करता येत नसल्याने अंतर्गत कुरबूर मात्र सुरू आहे. अकोला जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम विदर्भात एक-दोन पदाधिकारी सोडले तरी कुणीही मनापासून मिटकरी यांच्या नियुक्तीचा स्वीकार केलेला नसल्याचेच यावरून दिसून येते.

अकोला जिल्हा हा काँग्रेसचा कधीकाळी बालेकिल्ला होता. ८० च्या दशकात प्रकाश आंबेडकर यांचा अकोला जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश झाल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसचे वर्चस्व हळूहळू संपुष्टात आले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसला राष्ट्रवादीच्या रुपाने नवीन स्पर्धक निर्माण झाला. समविचारी असले तरी राष्ट्रवादीने काँग्रेसच्या कोट्यातील मतदारांवरच हक्क सांगितल्याने या दोन्ही पक्षांना एकत्र येवून मतविभाजन टाळावे लागले. एकत्र आल्यानंतरही अकोला जिल्ह्यात काँग्रेस असो व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना पुन्हा जम बसविता आला नाही. 

बिडकर यांच्यानंतर अकोल्यात राष्ट्रवादीची पाटी कोरीच

त्यामुळे तुकाराम बिडकर यांच्यानंतर अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पाटी कोरीच राहिली. अनेक दिग्गज नेत्यांनी भाग्य आजमावून बघितले. मात्र कुणालाही पक्षाची स्थिती बदलता आली नाही.  हीच स्थिती पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यात झाल्याने अजितदादांनी येथे पर्यायी नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केला. थेट अमोल मिटकरी यांना विधान परिषदेवर नियुक्ती देवून पश्चिम विदर्भातील राष्ट्रवादीमध्ये असलेली नेतृत्वाची दरी भरून काढण्याचा दादांनी केलेला हा प्रयोग वऱ्हाडातील नेत्यांना मात्र रुचला नाही.

मात्र दादांनी केलेली नियुक्ती असल्याने त्याचा सार्वजनिकरित्या कुठे विरोधही करणे शक्य नाही. त्यामुळे ही नियुक्ती झाल्यानंतर तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करण्याशिवाय या नेत्यांना पर्याय शिल्लक राहिला नाही. मात्र ज्यांना ही नियुक्ती रुचली नाही त्यांनी आपले मन पक्षाच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांकडे  मोकळे करण्यास सुरुवात केली आहे. त्यातून मिटकरी यांच्या नियुक्तीनंतरही अंतर्गत धुसफूस असल्याचे दिसून येते.

मनमोकळपणाने स्वागत नाही

अकोला जिल्ह्यातील राजकारणाची एक परंपरा राहिली आहे. कुणाचीही मोठ्यापदावर नियुक्ती झाली की, आपण या नेत्याच्या कसे जवळचे आहोत, हे सिद्ध करण्यासाठी सोशल मीडिया व इतर माध्यमातून जोरदार जाहिरातबाजी केली जाते. मात्र मिटकरी हे अकोला जिल्ह्यातील मास लिडर नसल्याने अजितदादांनी केलेल्या नियुक्तीनंतरही त्यांचे अकोला जिल्ह्यात मनमोकळेपणाने कुणी स्वागत करू शकले नाही. मिटकरी यांच्या गटाचे ठरवून आपल्याला जिल्ह्यातील इतर नेत्यांकडून त्रास तर होणार नाही ना, अशी भावना असल्याने मिटकरीच्या स्वागताबाबत बहुतांश कार्यकर्ते व नेत्यांनी धाडस केलेले दिसत नाही. अगदी त्यांच्या जवळचे मित्र म्हणविणाऱ्यांनीही जाणीवपूर्वक नियुक्तीबाबत सार्वजनिकरित्या जाहीर भाष्य करण्याचे टाळल्याचे दिसून येते.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख