सोलापूर जिल्ह्यातील या नगरपरिषद, नगरपंचायतींवर प्रशासक येणार  - Administrator will be appointed on Mohol, Madha and Malshiras Municipal Councils | Politics Marathi News - Sarkarnama

सोलापूर जिल्ह्यातील या नगरपरिषद, नगरपंचायतींवर प्रशासक येणार 

प्रमोद बोडके 
गुरुवार, 1 एप्रिल 2021

या तीनही ठिकाणी वेळेत निवडणुका शक्‍य नसल्याने प्रशासकाची नियुक्ती होण्याची दाट शक्‍यता आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषद, माढा आणि माळशिरस नगरपंचायतीच्या विद्यमान सदस्यांची मुदत 8 मे 2021 रोजी पूर्ण होत आहे. या तीनही ठिकाणी वेळेत निवडणुका शक्‍य नसल्याने प्रशासकाची नियुक्ती होण्याची दाट शक्‍यता आहे. 

राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने मोहोळ, माढा, माळशिरससह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायत, सातारा जिल्ह्यातील लोणंद नगरपंचायत आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा नगरपंचायतसाठी निवडणूकपूर्व प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. या नगर परिषद व नगर पंचायातींमधील अंतिम प्रभाग रचना झाली आहे. 

राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने प्रारुप मतदार यादीचा कार्यक्रम ता. 30 मार्च रोजी प्रसिद्ध झाला आहे. येत्या ता. 19 एप्रिल रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असून ता. 19 एप्रिल ते ता. 29 एप्रिल या कालावधीत प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन येथील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ता. 15 जानेवारी 2021 पर्यंतची विधानसभेची अद्ययावत मतदार यादी वापरली जाणार आहे. 

या निवडणुकांसाठी अंतिम मतदार यादी कधी प्रसिद्ध होणार? याबाबत मात्र राज्य निवडणूक आयोगाने 30 मार्चच्या आदेशात कोणताही स्पष्ट उल्लेख केलेला नाही. त्यामुळे या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका वेळेत होण्याची शक्‍यता कमीच आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषद, माढा व माळशिरस नगरपंचायतच्या सदस्यांची मुदत 8 मे 2021 रोजी पूर्ण होत आहे. कुडाळ नगरपंचायतीची 11 मे, लोणंद नगरपंचायतीची 3 मे, तर लोहारा नगरपंचायतीची 6 मे रोजी मुदत पूर्ण होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणे, प्रत्यक्ष मतदान व निकाल या सर्व प्रक्रियेसाठी किमान 35 दिवसांचा कालावधी आवश्‍यक आहे. या नगर परिषद व नगर पंचायातींच्या निवडणुकीसाठी अद्यापही प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्याने विद्यमान सदस्यांची मुदत संपण्यापूर्वी निवडणूक होण्याची शक्‍यता कमी आहे. 

मोहोळ नगर परिषदेवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. माळशिरसमध्ये भाजप पुरस्कृत स्थानिक आघाडीची सत्ता आहे. माढा नगरपंचायतीध्ये माजी आमदार धनाजी साठे यांच्या गटाची सत्ता आहे. 

पंढरपूर पोटनिवडणुकीमुळे संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी सध्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या जागेसाठी 17 एप्रिल रोजी मतदान, तर 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मोहोळ नगरपरिषद, माढा व माळशिरस नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख