सोलापूर जिल्हा बँकेची निवडणूक राष्ट्रवादीला का नकोय; प्रशासकाला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ  - Administrator of Solapur District Bank extended till December | Politics Marathi News - Sarkarnama

सोलापूर जिल्हा बँकेची निवडणूक राष्ट्रवादीला का नकोय; प्रशासकाला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ 

प्रमोद बोडके 
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

सोलापूर जिल्हा बँकेची निवडणूक होणार कधी? असाच प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

सोलापूर : भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मे 2018 मध्ये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासकाची नियुक्ती केली होती. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार येऊन दीड वर्ष उलटले तरीही बँकेवरील प्रशासक कायम आहे. बँकेवरील प्रशासक हटवून निवडणूक घेण्याऐवजी राज्य सरकारने बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांना पुन्हा एकदा मुदतवाढ दिली असून ते डिसेंबर 2021 पर्यंत कायम राहणार आहेत.
 
दरम्यान, भाजपने बँकेवर आणलेले प्रशासक मंडळ हटवून त्या जागी लोकनियुक्त संचालक मंडळ कधी येणार, तसेच राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा बँकेची निवडणूक का नको आहे, असा सवाल सोलापूरच्या राजकीय वर्तुळाला पडला आहे. 

राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. तत्कालीन सरकारकडून मे 2018 मध्ये या बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर राज्याच्या सत्तेतून भारतीय जनता पक्ष पायउतार झाला. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. 

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे वर्चस्व राहिलेले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर येऊनदेखील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर नियुक्त केलेल्या प्रशासकांना हटवून या बँकेची निवडणूक घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस फारशी उत्सुक दिसत नाही. 

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांना महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. बँकेवर 2018 मध्ये प्रशासकाची नियुक्ती झाली. सुरुवातीला सहा महिन्यांसाठी असलेली नियुक्ती पुन्हा एकदा मुदतवाढ देउन वाढविण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये प्रशासक शैलेश कोतमिरे यांना मुदतवाढ देण्यात आली. जिल्हा बँकेवरील प्रशासकांचा कालावधी 2 जून 2021 रोजी संपत असल्याने राज्य सरकारच्या वतीने प्रशासकांना 3 जून 2021 पासून पुढे सहा महिन्यांसाठी कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

सहकार विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे आता डिसेंबर 2021 पर्यंत तरी जिल्हा बँकेवर प्रशासक कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने सहकारी संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जिल्हा बँकेच्या प्रशासकांचाही कालावधी जूनपासून सहा महिन्यांनी वाढविण्यात आला आहे. सोलापूर जिल्हा बँकेची निवडणूक होणार कधी? असाच प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख