रोहित पवारांनी घेतला करमाळ्याचा आदिनाथ सहकारी साखर कारखाना  - Adinath Sahakari Sugar Factory in Karmala leased by Rohit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

रोहित पवारांनी घेतला करमाळ्याचा आदिनाथ सहकारी साखर कारखाना 

आण्णा काळे 
मंगळवार, 12 जानेवारी 2021

आमदार संजय शिंदे हेदेखील हा कारखाना घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शिंदे समर्थकांकडून सांगण्यात येत होते.

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या "बारामती ऍग्रो'ला 25 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय झाला आहे. राज्य शिखर बॅंकेचे कर्ज असल्याने बॅंकेकडून हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू होती. मुंबईत आज (ता. 12 जानेवारी) राज्य बॅंकेच्या कार्यालयात झालेल्या लिलाव प्रक्रियेत हा कारखाना "बारामती ऍग्रो'कडे देण्यात आला. 

दरम्यान, आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर घेण्यासाठी आमदार पवार उत्सुक असल्याचे वारंवार बोलले जात होते. मात्र, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हेदेखील हा कारखाना घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शिंदे समर्थकांकडून सांगण्यात येत होते. पण, आमदार शिंदे यांनी याबाबत काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. 

गेली 15 वर्षांपासून आदिनाथ कारखान्यावर रश्‍मी बागल यांच्या नेतृत्वाखाली बागल गटाची एकहाती सत्ता होती. मात्र, संचालकांमधील मतभेद, योग्य नियोजनाचा अभाव, संचालकाअंतर्गत एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप अशा कारणांमुळे हा कारखाना अडचणीत येत गेला. मुंबईत आज झालेल्या लिलाव प्रक्रियेत "बारामती ऍग्रो'ने हा कारखाना चालविण्यास घेतला. 

आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या आस्मितेचा विषय होता. मात्र हा कारखाना मागील दहा वर्षांपासून रडतखडत चालत असल्याने कारखान्यावर कोट्यवधींचे कर्ज झाले होते, त्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांना कारखाना जवळ असूनही बाहेरील कारखान्यांना ऊस द्यावा लागत होता. हा कारखाना सहकारीच राहावा, असे अनेकांना वाटत असताना "बारामती ऍग्रो'ने हा कारखाना चालवण्यास घ्यावा, असाही सूर शेतकऱ्यांमधून येत होता. 

कारखान्याच्या चहूबाजूंनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड असताना देखील कारखाना चांगल्या पद्धतीने चालू शकला नाही. आदिनाथ कारखान्याच्या कामगारांच्या पगाराचा प्रश्न तर महाराष्ट्रभर गाजला होता. अशा परिस्थितीत आदिनाथ कारखान्यावरील कर्जाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना कारखाना बंद अवस्थेत गेला. त्यामुळे आदिनाथ कारखान्याची विक्री केली जाणार की भाडेतत्त्वावर चालवला जाणार, याविषयी गेल्या वर्षभरापासून चर्चा सुरू होती. 

आदिनाथ कारखाना "बारामती ऍग्रो'ने चालवायला घेतल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्याची ऊस घालवण्यासाठी होणारी फरफट थांबून इतर कारखान्यांपेक्षा चांगला भाव मिळेल, अशी आशा तालुक्‍यातील शेतकऱ्यांना आजच्या निर्णयाने वाटू लागली आहे. 

करमाळा तालुक्‍यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालवताना "बारामती ऍग्रो'कडून कोणत्याही प्रकारचे राजकारण केले जाणार नाही. कारखाना आदर्श पद्धतीने चालविण्याचा आमचा मानस आहे. ज्या पद्धतीने "बारामती ऍग्रो' कारखाना उत्कृष्ट पद्धतीने चालवला जातो. त्याच पद्धतीने आदिनाथ कारखाना नियोजनाबद्ध पद्धतीने चालवला जाईल. 

- सुभाष गुळवे, उपाध्यक्ष, बारामती ऍग्रो 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख