मंगळवेढ्याची निवडणूक अन्‌ ढोबळेंचं नाव निघाल्याशिवाय कसं राहील! - When Ajit Pawar mentioned Laxman Dhoble's name, laughter erupted in the meeting | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

मंगळवेढ्याची निवडणूक अन्‌ ढोबळेंचं नाव निघाल्याशिवाय कसं राहील!

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

सध्या त्यांचं काय चाललंय आणि कसं चाललंय, हे तुम्हीच बघताय.

मंगळवेढा : मंगळवेढ्याची निवडणूक आणि या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचं नाव निघणार नाही, असं शक्यच होत नाही. या वेळी त्यांची आठवण तालुक्यातील मतदारांना तर आलीच पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेही त्यांना विसरू शकले नाहीत. मंगळवेढ्यातील एका सभेत बोलताना त्यांनी ढोबळे यांचा उल्लेख करताच सभेत एकच हशा पिकला.

मंगळवेढ्यातील सभेत बोलताना अजित पवार म्हणाले होते की पोटनिवडणुकीत भगिरथ भालके यांना उमेदवारी देताना पवार साहेबांनी विचार केला होता. राज्यपाल नियुक्त जागांमधील चार जागा या राष्ट्रवादीला येणार आहेत. त्या चार जागांवर माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी खासदार राजू शेट्टी, डॉ यशपाल भिंगे आणि ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांची शिफारस पवारसाहेबांनी केली आहे. यातील आनंद शिंदे हे मूळचे मंगळवेढ्याचे असलेले प्रख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांचे चिरंजीव. आनंद शिंदे यांचे चिरंजीव आदर्श शिंदे. या सर्व शिंदे मंडळींनी गीतांच्या माध्यमातून सर्वांना आपलंसं केलं आहे. 

ज्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सही करतील, त्यावेळी मंगळवेढेकरांना आनंद शिंदे यांच्या रूपाने आणखी एक आमदार मिळणार आहे. खरं तर सही करण्यासाठी एवढा वेळ लागण्याचं काही कारण नाही. मात्र, ते नियमाप्रमाणे आहे. नियमाच्या बाहेर जाऊन काही करा, असे मी कदापि सांगणार नाही. पण नियमांत बसतं, ते तरी करा. पण तेही करण्याची दानत या ठिकाणी दिसत नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी राज्यपालांच्या भूमिकेवर बोट ठेवले होते. 

मंगळवेढा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व अनेक मान्यरांनी केले. सुरुवातीच्या काळात म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकसभा आणि विधानसभेची एकत्र निवडणूक असायची. त्यावेळी तुम्ही गणपतराव सोनवणे यांना निवडून दिलं. त्यानंतरच्या काळात दोन वेळा कि. रा. मर्दा ऊर्फ मारवाडी वकिलांना निवडून दिलं. मारवाडी वकिलानंतर निवृत्ती कांबळे यांनी या भागाचे प्रतिनिधीत्व केलं. त्यांच्यानंतर विमल बोऱ्हाडे ह्या आमदार होत्या.

त्यानंतरच्या काळात म्हणजे चार वेळा पवारसाहेबांनी सांगितलं म्हणून तुम्ही त्या लक्ष्मणराव ढोबळेंना निवडून दिलं. (ढोबळे यांचं नाव घेताच व्यासपीठावरील मंडळींसह सभेत एकच हशा पिकला. काहींनी शिट्याही वाजवल्या). पण, सध्या त्यांचं काय चाललंय आणि कसं चाललंय, हे तुम्हीच बघताय. तुम्ही बघातय बाकीच्यांची नावं घेतली, त्यावेळी लोकांनी ती ऐकली. मात्र, ह्यांचे नाव घेताच लोकं हसतात, म्हणजे लोकांनाही पटतंय. ढोबळे यांच्यानंतर डॉ. रामचंद्र साळे यांनी या भागाचे नेतृत्व केले. त्यानंतर तीन निवडणुकीत भालके यांना निवडून दिलं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या मान्यवरांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे, असे अजित पवार म्हणाले होते.

दरम्यान, ढोबळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने मंत्रिपदाची संधी देऊनही मागच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भारतीय जनता पक्षात दाखल झाले आहेत. भाजपत गेल्यापासून ते राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला झाल्याचे चित्र आहे. त्याकडेच अजित पवारांनी न बोलता बोट दाखवले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख